मुंबई पुण्याहून आलेल्या लोकांकडे संशयाने पाहू नका - राजेश टोपे

 
मुंबई पुण्याहून आलेल्या लोकांकडे संशयाने पाहू नका - राजेश टोपे

मुंबई- गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाध साधला. आज राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १०६ वर गेला आहे. आतापर्यंत राज्यात तीन नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. १८९० रूग्णांची तपासणी निगेटिव्ह आलेली आहे. आज १५ जणांना डिस्चार्ज मिळू शकतो, ही समाधानाची बाब आहे. केवळ २ रुग्णांची प्रकृती गंभीर असून उर्वरित रूग्णांची प्रकृती ठीक आहे. त्यामुळे हा आजार बरा होऊ शकतो, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या दृष्टीकोनातून संचारबंदीचा निर्णय घेतलाय. पुढील दिवसात कोणत्या उपाययोजना राबवता येतील वा कोणते खबरदारीचे उपाय घेतले पाहिजेत, याबाबत संबंधित विभागांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेशी यंत्रणा आणि उपकरणे आहेत की याची माहितीही घेण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

आज महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत १००० रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचा खर्च या योजनेतून करण्यात आला आहे. शिवाय सीएसआरच्या माध्यमातून अनेक खाजगी कंपन्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत, त्यांचे आभार यावेळी राजेश टोपे यांनी मानले.

राज्यात संचारबंदी असतानाही अनेक ठिकाणी नागरिक जीवनावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सहज भाजीपाला किंवा इतर गोष्टी उपलब्ध होतील, अशी व्यवस्था करावी आणि कृपया नागरिकांनी गर्दी करू नये. सरकारने सांगितलेले नियम पाळावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

ग्रामीण भागात मुंबई पुण्याहून आलेल्या लोकांकडे संशयाने पाहिले जातेय. मात्र ते बाधित देशातून आले, असा समज कृपया करू नका. लक्षणे दिसल्यास त्यांना दवाखान्यात दाखल करा. परंतु माणुसकी सोडू नका, अशी विनंती त्यांनी केली. शिवाय विविध धर्माच्या धर्मगुरूंनी आरोग्यदूत म्हणून कोरोनाविषयी जनजागृती करावी, आपापल्या धर्मातील बांधवांना योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले. खाजगी रुग्णालयांनी ओपीडी बंद करू नये, डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.

गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष.. मात्र यंदा घरी थांबून आपण कोरोनाला हरवूया. या संकटाला टाळायचं असेल तर ‘मीच आहे माझा रक्षक’ हा मंत्र अवलंबून कोरोनाचा पराभव करुया, असा संकल्प जनतेला करण्याचा संदेश देऊन आरोग्यमंत्र्यांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

From around the web