खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवू नयेत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 
महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांची काळजी घेणार
खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवू नयेत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई  : खासगी डॉक्टर्सनी   आपले दवाखाने बंद ठेवूनयेत, नियमित रुग्णांची गैरसोय करू नये , असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांतून प्रवास करताना   प्रवासी आढळले तर कारवाई केली जाईल. राज्यांच्या सीमा सध्या बंद असून महाराष्ट्रात अडकलेल्या इतर राज्यांतीलनागरिकांची राज्य शासन काळजी घेईल , असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आज सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी वर्षानिवासस्थान येथून व्हिडीओ   कॉन्फरन्सद्वारे ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील महत्वपूर्ण सूचना केल्या. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे , परिवहन मंत्री अनिल परब , मुख्य सचिव अजोय मेहता , पोलीस महासंचालक   सुबोधकुमारजायस्वाल , पोलीस आयुक्त परमबीर सिंह , मनपा आयुक्त प्रवीण परदेशी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले कि ,   खासगी डॉक्टर्सनी त्यांचे दवाखाने सुरु ठेवणे गरजेचे आहे. करोनाव्यतिरिक्त देखील त्यांच्याकडे इतर आजारांच्या उपचारासाठी रुग्ण येतात. त्यात वयोवृद्ध ,   महिला ,   मुले असतात.त्यांची गैरसोय होऊ नये .   लवकरच आपण अत्यावश्यक सेवेतील सर्वांना ओळखपत्र देत आहोत. त्यात डॉक्टर ,   त्यांच्याकडील कर्मचारी यांचा समावेश असेल.
आपल्या जिल्ह्यात परदेशांतून गेल्या १५ दिवसांत जर कुणी प्रवास करून आले असेल तर जिल्हाधिकारी यांनी त्यांची माहिती घ्यावी व सदरील व्यक्तींची तपासणी करून घेणे महत्वाचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित राहील ,   औषधे लोकांना मिळतील हे पाहावे. शेतकरी आणि विशेषतः: शेतीच्या कामासाठी जा - ये करणारे यांना अडथळा होणार नाही, हे पाहावे.
इतर राज्यांतून आपल्या राज्यात येऊन थांबलेल्या नागरिकांची इथेच आम्ही काळजी घेऊ ,   त्यांना लॉकडाऊन पूर्ण होईपर्यंत परत पाठवणे शक्य होणार नाही. महाराष्ट्रातील लोक जर इतर राज्यांत कुठे अडकले असतील तर त्यांचीही त्या त्या राज्यांनी काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत.
जीवनावश्यक वस्तूंसाठी उपयोगात आणली जाणारी वाहतूक पोलीस अडवणार नाहीत, पण अशा वाहनांमधून या कामाशी संबंधित नसलेले लोक प्रवास करताना आढळले तर कारवाई केली जाईल.प्रत्येक जिल्ह्यात किती रुग्ण क्वारंटाईन करू शकतो तसेच करोनासाठी किती वॉर्ड किंवा रुग्णालय राखून ठेवू शकतो त्याचे व्यवस्थित नियोजन करून तात्काळ कळवावे.करोनाविरुद्धच्या या लढाईत आपण अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने जात आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक कामाची योग्य विभागणी करावी ,   अधिकाऱ्यांना जबाबदारी वाटून द्यावी व मुख्यालयाच्या संपर्कात राहावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे ,   त्यांनी डोके शांत ठेवावे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यात किराणा ,   भाजीपाला घेण्यासाठी काही ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून नागरिकांमध्ये योग्य अंतर ठेवण्याच्या कल्पनांचे त्यांनी स्वागत केले.    

From around the web