आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला ... 

भाजपाला विस्ताराची संधी- देवेंद्र फडणवीस
 
s

मुंबई - भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तीन पक्षांनी आघाडी केल्यामुळे त्या पक्षांचा अवकाश कमी होऊन श्वास कोंडला गेला आहे तर दुसरीकडे भाजपाला संपूर्ण राज्यभर मोकळ्या श्वासाने काम करून पक्ष विस्ताराची संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी स्वबळावर सत्तेवर येईल, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.

            शिवसेनेच्या नेत्या व पुणे जिल्हा परिषद सदस्य  आशा बुचके यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात  देवेंद्र फडणवीस बोलत होते. भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे आपल्याला मोकळा श्वास घेतल्यासारखे वाटते, असे आशा बुचके यांनी प्रवेश केल्यानंतर सांगितले होते. त्याचा धागा पकडून  देवेंद्र फडणवीस यांनी टिप्पणी केली.

            ते म्हणाले की, राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपाला पक्षविस्ताराची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. युतीमध्ये असताना भाजपाला पक्षविस्ताराला संधी मिळत नव्हती. आता तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यातील घटक पक्षांचा श्वास कोंडू लागला आहे. आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात मोकळ्या श्वासाने पक्षाचे काम करू आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर भाजपाला सत्तेवर आणू. आशाताईंसारख्या कार्यकर्त्या सत्तारूढ पक्षातून भाजपामध्ये येतात ही स्वबळावरील विजयाची नांदी आहे.

            ते म्हणाले की, आशाताई बुचके यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांचा भाजपामध्ये सन्मान केला जाईल. भाजपामध्ये आतला - बाहेरचा, जुना – नवा असा भेद नाही. एकदा पक्षाचा झेंडा हाती घेतला की पक्ष त्या नेत्याची काळजी करतो.

    . चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, आशाताई बुचके यांना शिवसेनेत न्याय मिळाला नाही. पण भाजपामध्ये त्यांचा सन्मान राखला जाईल आणि त्यांना न्याय मिळेल. जेव्हा विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळी त्यांना आमदार झालेले पाहू.

          आशा बुचके म्हणाल्या की, भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला मोकळा श्वास घेतल्यासारखे वाटते. पक्षाची कार्यकर्ता म्हणून आपण प्रत्येक घरात कमळ पोहचविण्यासाठी काम करू.

            यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आणि वाहतूक आघाडी संयोजक हाजी अराफत उपस्थित होते.

From around the web