शासन परवानगी, कायदेशीर सल्ला आणि निविदेला बगल देत मुंबई विद्यापीठात बेकायदेशीर चित्रीकरण !

मुंबई विद्यापीठाचा असाही कारभार
 
s

मुंबई - विद्यापीठाच्या कलिना संकुलातील अत्यंत महत्त्वाची जागा मुंबई विद्यापीठ प्रशासनाने आठ महिन्यांच्या चित्रीकरणासाठी भाडेकरारावर दिली असून शासनाची परवानगी घेतली नाही, कायदेशीर सल्ला घेतलेला नाही आणि निविदा न मागवल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई विद्यापीठाने दिली आहे. प्रति एकर अशी 5 एकर जमीन 8 महिन्याकरिता 75 लाख रुपये भाड्यावर दिलेली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे चित्रीकरणासाठी सिद्धेश एंटरप्राइजेसला दिलेल्या 5 एकर जागेबाबत विविध माहिती विचारली होती. मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव अशोक घुले यांनी अनिल गलगली यांस कळविले की महाराष्ट्र शासनाकडे परवानगी बाबत मुंबई विद्यापीठांने कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही.  तसेच मुंबई विद्यापीठात फीचर फिल्मच्या चित्रीकरणाकरिता पाच एकर जागा ही मेसर्स सिद्धेश इंटरप्रायजेसला देण्यासाठी कोणत्याही निविदा मागविण्यात आल्या नाहीत.

अनिल गलगली यांच्या मते मुंबई विद्यापीठाने शिक्षणाच्या पवित्र मंदिरात अश्या प्रकारचा चुकीचा पायंडा न घालणे योग्य ठरले असते.अशा महसुल प्रकरणात शासन परवानगी सोबत कायदेशीर सल्ला घेत निविदा जारी केल्या असत्या तर निश्चितच कोट्यावधी रुपयाचे भाडे प्राप्त झाले असते. कारण मुंबईमध्ये गोरेगाव येथील फिल्मसिटीचे भाडेदर हे जास्त आहे. तेथील दरांची तरी माहिती घेणे आवश्यक होते. यात काही राजकीय व्यक्तींचे धागेदोरे असण्याची शक्यता आहे. म्हणून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी अनिल गलगली यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

From around the web