सोलापुरात ११ डिसेंबर गुरव समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार
 
gurav
सोलापूर - सोलापूरच्या नेहरूनगर ( विजापूर रोड ) येथील  शासकीय मैदानावर येत्या ११ डिसेंबर ( रविवार ) रोजी दुपारी एक वाजता गुरव समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या महाअधिवेशनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


गुरव समाजाचे पहिले राष्ट्रीय  महाअधिवेशन पंढरपूर येथे १९९९ मध्ये पार पडले होते, या अधिवेशनास तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी उपस्थित राहिले होते, त्यानंतर  तब्बल २३ वर्षानंतर गुरव समाजाचे दुसरे राष्ट्रीय भव्य महाअधिवेशन सोलापुरात होत असून, त्याची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती स्वागताध्यक्ष विजयराज शिंदे, नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन ढेपे, राष्ट्रीय महासचिव मल्लिकार्जुन गुरव यांनी दिली.

मराठा समाजाच्या धर्तीवर गुरव समाजासाठी संत काशिबा महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अनेक मंदिरातील पुजाऱ्यावर गावातील धनधांडगे आणि गुंड प्रवूतीचे लोक अन्याय करत असून, त्यांना संरक्षण देण्यात  यावे तसेच पत्रकारांच्या धर्तीवर कायदा करण्यात यावा, ज्या देवस्थानमध्ये उपन्न नाही, तेथील पुजाऱ्यांना दरमहा २५ हजार मानधन देण्यात यावे, राज्यातील देवस्थान शासकीय समितीवर गुरव समाजाला प्रतिनिधित्व देण्यात यावे,गुरव समाजाच्या नावावर असलेल्या इनामी जमीनी  खालसा करून त्यांना पीक कर्ज, विमा आदींचा लाभ मिळवून द्यावा आदी मागण्या या अधिवेशनाच्या निमित्ताने करण्यात आल्या आहेत.

या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभरात बैठकाचे सत्र सुरु आहे. या महाअधिवेशनास किमान एक लाख गुरव समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन ढेपे यांनी दिली. 

From around the web