दिलीप नाईकवाडी यास पोलीस अटक केव्हा करणार ?

 

तुळजापूर पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त 


 दिलीप नाईकवाडी यास पोलीस अटक केव्हा करणार ?


तुळजापूर  :  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरातील   सोन्या - चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारणारा तात्कालिन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी विरोधात तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होवून  एक महिना झाला तरी त्यास  तुळजापूरचे पोलीस अटक करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या  धार्मिक व्यवस्थापकपदी दिलीप नाईकवाडी कार्यरत असताना 29 नोव्हेंबर 2001 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत नाईकवाडी यांनी पदाचा दुरुपयोग करत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान व भाविकांची फसवणूक केली असून त्याचा ताब्यात असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचा खजिना व जामदार खान्यातीलअतिप्राचिन अलंकार, वस्तू तसेच भाविकांनी अर्पण केलेले सुमारे 348.661 ग्रॅम सोने व सुमारे 71698.274 ग्रॅम चांदीच्या वस्तू तसेच उपरोक्त 71 प्राचीन नाणे यांचा वैयक्तिक स्वार्थासाठी अपहार चोरी केली.


तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी  या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्यावर एक महिन्यापूर्वी प्रशासकीय अधिकारी योगिता कोल्हे यांनी  तुळजापूर पोलीस  स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, त्यानंतर तात्कालिन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी विरोधात कलम 420, 464, 409, 467, 468, 471, 381 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

काय आहे प्रकार ? 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या खजिन्यातील  सोन्या चांदीचे दागिने तसेच ७१ ऐतिहासिक व पुरातन नाण्यांसह मौल्यवान वस्तू गायब असल्याची तक्रार पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे 9 मे 2019 रोजी केली होती, त्यांनतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी तात्काळ याचे गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली होती.

मौल्यवान दागिन्यांच्या या चोरी प्रकरणात दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची शिफारस चौकशी अहवालात करण्यात आली होती. अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. त्यानुसार तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलिप नाईकवाडी यांच्यावर अफरातफर आणि गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. मात्र अनेक महिन्यांपासून प्रत्यक्षात नोंदविण्यात आला नव्हता. गुरुवार १० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कौस्तुक दिवेगावकर यांनी शासनाच्या आदेशानुसार याप्रकरणी दिलिप नाईकवाडी याच्यावर मौल्यवान व ऐतिहासीक दागिन्यांच्या गैरव्यवहारप्रकरणी तत्काळ तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश मंदिर समितीचे विश्वस्त तथा तुळजापूर तहसीलदार यांना दिले होते.

श्री तुळजाभवानी मंदीर संस्‍थान विश्वस्त तुळजापूर’ येथील तत्कालीन सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक)- दिलीप देवीदासराव नाईकवाडी यांनी दि. 29.11.2001 ते 30.11.2018 या कालावधीत कार्यरत होते. दरम्यान आपल्या पदाचा दुरुपयोग करुन त्यांनी मंदीर संस्थानच्या खजाना व जामदार खान्यात ठेवलेले सुवर्ण, चांदी, मौल्यवान रत्ने अशा प्राचीन व ऐतीहासीक अलंकार, वस्तु, 71 पुरातन नाणी तसेच भावीकांनी अर्पन केलेले 349 ग्रॅम सोने व सुमारे 71.7 किलोग्रॅम चांदीच्या वस्तु यांचा वैयक्तीक स्वार्थासाठी अपहार केला. असे जिल्हाधिकारी, उस्मानाबाद कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या चौकशी अहवालातून शाबीत झाले असुन प्रस्तुत प्रकरणी शासनातर्फे प्रथम खबर नोंदवण्यास मला प्राधिकृत करण्यात आले आहे.

अशा मजकुराच्या श्री तुळजाभवानी मंदीर संस्‍थान विश्वस्त, तुळजापूर च्या व्यवस्थापीका- श्रीमती योगिता कोल्हे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 409, 464, 467, 468, 471, 381 अन्वये दि. 13.09.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

गुन्हा दाखल होऊन एक महिना झाला तरी तुळजापूर पोलीस आरोपी नाईकवाडी यास अटक करीत  नसल्याने उलट सुलट चर्चा सुरु आहे. नाईकवाडी  याने पोलिसांना मॅनेज केले असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. 

From around the web