तुळजापूरचे डीवायएसपी दिलीप टिपरसे यांच्यासह आठ पोलीस कर्मचाऱ्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल 

वादग्रस्त डीवायएसपी  टिपरसे यांची अखेर औरंगाबादला बदली 
 
तुळजापूरचे डीवायएसपी दिलीप टिपरसे यांच्यासह आठ पोलीस कर्मचाऱ्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल

तुळजापूर - तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांचे सहकारी रवींद्र ढवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून पोलीस कोठडीत बेदम मारहाण करणाऱ्या डीवायएसपी दिलीप टिपरसे, तत्कालीन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सपोनि राठोड, पोलीस उपनिरीक्षक झिंजुर्डे यांच्यासह आठ पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध  न्यायालयाच्या आदेशावरून मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वादग्रस्त डीवायएसपी दिलीप टिपरसे यांची औरंगाबादला बदली करण्यात आली आहे. 

तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांची पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी १ नोव्हेंबर २०१९ रोजी बदली करून वादग्रस्त पोलीस निरीक्षक  हर्षवर्धन गवळी यांची नेमणूक केली होती. त्यानंतर तुळजापुरात अवैध धंद्याला पेव फुटले होते तसेच भुरट्या चोऱ्या वाढल्या होत्या.

यासंदर्भात रवींद्र ढवळे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक ( औरंगाबाद ) यांना निवेदन पाठवून वादग्रस्त पोलीस निरीक्षक  हर्षवर्धन गवळी आणि  डीवायएसपी दिलीप टिपरसे  यांची बदली करावी अशी मागणी केली होती. त्यात वादग्रस्त पोलीस निरीक्षक  हर्षवर्धन गवळी  यांनी बीड जिल्ह्यात असताना एका पोलीस खात्यातील महिलेवर बलात्कार केला असून, गुन्हा दाखल असल्याचा उल्लेख केला होता तसेच पोलीस निरीक्षक  हर्षवर्धन गवळी आणि डीवायएसपी दिलीप टिपरसे यांच्या आशीर्वादामुळे अवैध धंदे सुरु असल्याचे म्हटले होते. 

हे निवेदन सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांनी, पत्रकारांना बातमीसाठी व्हाट्स अँप वरून पाठवले होते. त्यानंतर एका साप्ताहिकात या निवेदनावरून बातमी प्रसिद्ध झाली होती, त्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दि. २९ जानेवारी २०२० रोजी  निवेदन देणारे रवींद्र ढवळे आणि निवेदन व्हायरल करणारे राजाभाऊ माने यांच्याविरुद्ध ब्रिटिश  काळातील कलम ३ ( पोलिसांविरुद्ध अप्रतीची भावना भडकावणे ) तसेच भादंवि ५०० नुसार गुन्हा दाखल होता. त्यात हर्षवर्धन गवळी फिर्यादी तर डीवायएसपी दिलीप टिपरसे साक्षीदार झाले होते.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रवींद्र ढवळे यास अटक करून पोलीस कोठडीत बेदम मारहाण केली होती, याप्रकरणी तुळजापूर न्यायालयात रवींद्र ढवळे  यांनी पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा जबाब नोंदवला होता. नंतर कोर्टाच्या आदेशावरून मेडिकल केले असता त्यात तथ्य आढळले होते. याप्रकरणी तुळजापूर न्यायालयाने एफआयआर दाखल करताना पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षक यांची पूर्व परवानगी घेतली नाही अशी टिप्पणी करून, सरकार पक्षातर्फे विरुद्ध तक्रार नोंदवता येत नसल्याची ऑर्डर केली होती. बदनामी झाली असल्यास खासगी खटला न्यायालयात दाखल करू शकता, असे नमूद केले होते. 

त्यानंतर राजाभाऊ माने आणि रवींद्र ढवळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एफआयआर आणि आरोपपत्र ( चार्जशीट)  रद्द करण्यासाठी रिट पिटीशन दाखल केले होते. त्याची सुनावणी न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी आणि  टी.व्ही.नलावडे यांच्यासमोर झाली. पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर करून गुन्हा दाखल झाल्याचे स्पष्ट झाल्याने राजाभाऊ माने आणि रवींद्र ढवळे यांच्याविरुद्धचा  एफआयआर आणि आरोपपत्र ( चार्जशीट ) न्यायालयाने रद्द केला होता. 


मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल 

रवींद्र ढवळे यांनी, तुळजापूर न्यायालयात कोठडीत मारहाण झाल्याचा जबाब नोंदवल्यानंतर तालुका न्यायधीश यांनी, जिल्हा न्यायधीश यांना तसा  रिपोर्ट दिला दिला होता, जिल्हा न्यायाधीशांनी अतिरिक्त न्यायधीशाना चौकशी करण्याचे सूचित केले होते.  अतिरिक्त न्यायधीशानी  चौकशी करून, मारहाण झाल्याचा अहवाल दिला होता, त्यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी पुढील कारवाई करण्याचे आदेश तुळजापूर तालुका न्यायाधीश यांना आदेश दिले होते. त्यानुसार डीवायएसपी दिलीप टिपरसे, तत्कालीन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सपोनि राठोड, पोलीस उपनिरीक्षक झिंजुर्डे , पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार, चक्रधर पाटील, आतकरे यांच्यासह आठ पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक यांना  दिला. त्यानुसार डीवायएसपी दिलीप टिपरसे यांच्यासह आठ जणांविरुद्ध भादंवि ३२३, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डीवायएसपी दिलीप टिपरसे यांची औरंगाबादला बदली 

तुळजापूरचे  वादग्रस्त डीवायएसपी दिलीप टिपरसे यांची अखेर  औरंगाबादला महामार्ग सुरक्षा पोलीस विभागात बदली झाली आहे. तुळजापूरला असताना, टिपरसें यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. 

From around the web