उस्मानाबादच्या आरोग्य विभागाने कोरोना मृत्यूची आकडेवारी लपविली

तब्बल ४८५ आकड्याची तफावत, संबंधितांना करणे दाखवा नोटीस 
 
s
उस्मानाबाद लाइव्हचा दावा खरा ठरला 

उस्मानाबाद - कोरोना मृत्यूच्या आकडेवारीबद्दल उस्मानाबाद लाइव्हचा दावा  खरा ठरला आहे. उस्मानाबादच्या आरोग्य विभागाने तब्बल ४८५ मृत्यू अजूनही लपविले आहेत.  लातूरच्या आरोग्य उपसंचालकांनी या प्रकरणी जिल्हा साथरोग अधिकारी आणि अन्य दोघांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात एप्रिल आणि मे  महिन्यात कोरोनाने हाहाकार माजवला होता. दररोज २० पेक्षा अधिक रुग्ण मृत्यू पावत असताना, आरोग्य विभागाने आपला निष्क्रिय, दुर्लक्षित  कारभार आणि आलेले अपयश लपविण्यासाठी कोरोनाचे आकडे कमी दाखवले. नंतर कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतर मागील मृत्यू म्हणून दररोज पाचची भर टाकण्यात आली तरीही अजूनही  ४८५ आकड्याचा मेळ  बसलेला नाही. 

कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णावर अंत्यसंकार करण्याची जबाबदारी नगर परिषद कर्मचाऱ्यांकडे होती.त्यांच्याकडे असलेली आकडेवारी आणि पोर्टलवरील आकडेवारी याचा अजून मेळ बसलेला नाही.  पोर्टलवर आतापर्यंत १३८० रुग्णाचा मृत्यू दाखवण्यात आले आहेत ,  तरीही अजून  ४८५ रुग्णाची नोंद झालेली नाही. 


एप्रिल आणि मे  महिन्यात कोरोनाने  मृत्यू मोठ्या प्रमाणात झाले होते. मृत्यूचे खरे आकडे दाखवले असते तर लोक भयभीत झाले असते म्हणून आकडेवारी लपविण्यात आली पण ही लपवालपवी आता आरोग्य अधिकाऱ्यांच्या अंगलट आली आहे. 

उस्मानाबाद लाइव्हने याप्रकरणी वारंवार दावा केला होता की , आरोग्य विभागाने कोरोना मृत्यूचे आकडेवारी लपविली आहे,  लातूरचे आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले  यांनीच त्यावर  शिक्कामोर्तब केले आहे. 

याप्रकरणी  उस्मानाबादच्या तिघांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. जिल्हा साथरोग अधिकारी ( जिल्हा परिषद, उस्मानाबाद ),  जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि डेटा  मॅनेजर ( जिल्हा परिषद ) या तिघांना ही  नोटीस देण्यात आली आहे. 

त्यात म्हटले आहे की , कोविड  -१९ ची मृत्यूची आकडेवारी पोर्टलवरील आणि दैनंदिन प्रेस नोट  अहवाल यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. ही  बाब  अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. दि. ५ जुलै २०२१ रोजीच्या कोविड  - १९ पोर्टलवरील रुग्णाच्या यादी नुसार उस्मानाबाद जिल्ह्यात १८६१ मृत्यू असताना जिल्ह्याच्या दैनंदिन प्रेस नोट मध्ये १३७६ मृत्यू दर्शविले आहेत. एकूण ४८५ मृत्यूची तफावत आहे. याबाबत तातडीने खुलासा करण्याचे आदेशही  देण्यात आले आहेत . 

मृत्यूची आकडेवारी लपविणाऱ्या अधिकाऱ्यावर आता कोणती कारवाई होणार ? याकडे लक्ष वेधले आहे. 


 

From around the web