अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा

पण दुष्काळात तेरावा महिना !

 
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात मागील ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी अनुदान जमा होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र त्याला मराठवाडा पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता आडवी आली होती. मात्र निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळताच, शुक्रवारपासून अनुदान बँक खात्यावर जमा होवू  लागले आहे. मात्र बँकेला सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे तसेच अनेक बँकेच्या एटीएम मध्ये खडखडाट असल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना सुरु झाला आहे. 


ऑक्टोबर महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह अनेक नागरिकांचेही मोठे नुकसान झाले. ऐन खरीप हंगामाच्या काढणीच्या वेळी झालेल्या जोरदार अतिवृष्टीने शेतातील उभ्या पिकांसह काढून ठेवलेले पीक, जमीनही वाहून गेल्याने न भरून येणारे नुकसान झाले. अनेकांच्या शेतात पाऊस उघडल्यानंतरही आठ ते पंधरा दिवस गुडघाभर पाणी होते. यामुळे ऊस, सोयाबीन, उडीद, विविध फळबागा आदी पिकांचे नुकसान होऊन जमीनही खरवडून गेली होती.अनेकांची जनावरेही वाहून गेली तसेच घर, गोठ्यांचेही नुकसान झाले.

 या संकटानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , शरद पवार , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांच्यासह विविध खात्याच्या मंत्र्यांनी जिल्ह्यात पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून मुंबईतही मदत देण्याच्या अनुशंगाने नियोजनाचे काम सुरू आहे. याबाबत दोन दिवसात घोषणा करून दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर देऊन दिलासा देण्याचा शब्द दिला.त्यानुसार, प्रथम हेक्टरी मदतीची घोषणा करून तीनच दिवसांपूर्वी मदतीची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केली होती. तथापि  मराठवाडा पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता आडवी आली होती. मात्र निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळताच, शुक्रवारपासून अनुदान बँक खात्यावर जमा होवू  लागले आहे. 

 जिल्ह्यास मिळालेल्या पहिल्या टप्प्यातील १४८.३८ कोटी रुपयांपैकी १३३.८४ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या रक्कमेच्या तुलनेत दोन दिवसात ९१ टक्के मदतीची रक्कम खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.प्रशासनाकडून रक्कम मिळताच ती तत्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी कार्यवाही करण्यात आली. परंतु, ही रक्कम शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आता बँकांनी नियोजन करण्याची गरज आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या बहुतेक खातेदार शेतकऱ्यांकडे एटीएम आहेत. परंतु, ऐन सनासुदीत एटीएममध्ये खडखडात असतो. त्यातच लागून आलेल्या तीन सुट‌्यांमुळे अडचण वाढणार असून त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही बँकांना व एटीएममध्ये कॅश भरणाऱ्या कंपन्यांना ताकीद देऊन सुटीच्या काळातही एटीएममध्ये मुबलक कॅश उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

अनुदान किती जमा ? 

राज्य शासनाने हेक्टरी १० हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. जास्तीत जास्त दोन  हेक्टर पर्यंत ही  मदत दिली जाणार आहे. पैकी ५० टक्के रक्कम वितरित केली जात आहे. मात्र त्यातही काटछाट सुरु आहे. २ हेक्टर शेतकऱ्यास ७५०० तर १ हेक्टर शेतकऱ्यास ३७०० रुपये जॅम केले जात आहेत. सर्कल निहाय नुकसान काढून किती अनुदान द्यायचे हे काढले जात आहे. 

From around the web