श्री तुळजाभवानीचे मंदिर सोमवारपासून भाविकांसाठी खुले 

पण केवळ चार हजार भाविकांना दर्शन मिळणार 
 
श्री तुळजाभवानीचे मंदिर सोमवारपासून भाविकांसाठी खुले

तुळजापूर - गेली सात महिने कोरोना महामारीमुळे  कुलूपबंद असलेले श्री तुळजाभवानीचे मंदिर उद्या सोमवारपासून भाविकांसाठी खुले होणार आहे. पण दररोज केवळ चार हजार भविकांना  मंदिरात प्रवेश देण्यात येणार असून,यामुळे दर्शनासाठी आतुर असलेल्या लाखो भाविकांचा भ्रमनिरास होणार आहे. 

तुळजापूरची श्री तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. तिच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक , आंध्रप्रदेश , तेलंगना राज्यासह अन्य भागातून मोठ्या संख्येने भाविक येतात. दररोज किमान ३० ते ४०  हजार तसेच मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी किमान १ ते २ लाख भाविक तुळजापुरात येत असतात. त्यामुळे केवळ चार हजार भाविकांना दर्शन देऊन बाकी भाविकांना कसे रोखणार ? हा प्रश्न  प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. 

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकींग करावी लागणार असून  दररोज 4 हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानने केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. तुळजाभवानी मंदिराच्या वेबसाईटवर दररोज 1 हजार पेड दर्शन पास तर 3 हजार मोफत दर्शन पास उपलब्ध असणार आहेत. दर 2 तासाना 500 भाविकांना दर्शन मिळणार आहे.

तुळजाभवानी भक्तांना देवीचे मुखदर्शन मिळणार असून मुख्य गाभाऱ्यात प्रवेश नसणार आहे. ऑफलाईन मोफत दर्शन पास मंदिर परिसरात काढता येणार आहेत. तुळजाभवानी मंदिर परिसरात असलेल्या कार्यालयात मोफत पास पद्धतीची व्यवस्था करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिरात पहाटे ५ पासून रात्री ९ वाजेपर्यंत या 16 तासांच्या काळात भाविकांना दर्शन घेता येणार आहे. 

65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षापर्यंतच्या मुलांना, गर्भवती,गंभीर आजारी नागरिकांना मंदिर प्रवेशास व दर्शनासाठी बंदी असणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार भाविकांना तुळजाभवानी देवीचे मुखदर्शन दिले जाणार असुन दर्शन रांगेत सोशल डिस्टनससाठी वर्तुळाकार पट्टे ओढली जाणार आहे त्यासाठी किमान 6 फूट अंतर राखले जाणार आहे.

पुजारी, महंत व मानकरी हे तुळजाभवानी देवीच्या सर्व धार्मिक विधी व पुजा सरकारने दिलेल्या कोविड नियमानुसार करतील. भक्तांना तुळजाभवानी देवीच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक , सिंहासन पुजासह व इतर पूजा करता येणार नाहीत मात्र मुख दर्शन घेता येणार आहे.सामुहिक आरती करता येणार नसुन तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात भक्तांना प्रवेश नाही.तुळजाभवानी मंदिर अनेक महिन्यानंतर सुरू झाल्याने भाविकांनी एकाच दिवशी एकत्र गर्दी न करण्याचे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.

मंदिरात प्रवेश करताना या आहेत अटी  

जिल्ह्यातील कन्टेन्मेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रातील धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे यांचे ट्रस्ट/बोर्ड/नियामक प्राधिकरण यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार ती धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे नागरिकांसाठी खुली करण्यास दि. 16 नोव्हेंबर 2020 पासून परवानगी राहील. याठिकाणी नाकावर व तोंडावर मास्क/स्वच्छ रुमाल बांधणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंग, वारंवार हात धुणे (hand wash) अथवा सॅनिटायर्झसचा वापर करणे बंधनकारक राहील. धार्मिक स्थळे / प्रार्थनास्थळे याठिकाणी कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनां (SOP) चे पालन करणे आवश्यक राहील. संबंधित स्थानिक प्राधिकरणास संबंधित व्यवस्थापकांशी विचारविनिमय करुन स्थानिक परिस्थितीचा विचार करता या आदेशातील नमूद मार्गदर्शक सूचना/प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये नवीन मार्गदर्शक सूचना / प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा समावेश करता येईल.

याचबरोबर सामाजिक अंतर व कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने व जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळावेळी दिलेल्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक राहील.सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 16.11.2020 पासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी कळविले आहे.

From around the web