धक्कादायक : उस्मानाबाद जिल्ह्यातील ७० शिक्षक आणि 14 शिक्षकेतर कर्मचारी कोरोना पॉजिटीव्ह
उस्मानाबाद - राज्य सरकारच्या निर्देशानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळा ( इयत्ता ९ ते १२ ) आज ( २३ नोव्हेंबर ) रोजी सुरु झाली, पण विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प होती. दरम्यान जिल्ह्यतील ७० शिक्षक आणि 14 शिक्षकेतर कर्मचारी कोरोना पॉजिटीव्ह निघाले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली असून शाळा सुरु झाली तरी भीतीचे वातावरण पहावयास मिळाले.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या 10 नोव्हेंबर च्या परिपत्रकानुसारउस्मानाबाद जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग असलेल्या 491 शाळांपैकी 445 शाळा सुरू झाल्या असून 80292 विद्यार्थ्यांपैकी 11733 विद्यार्थी पालकांच्या संमतीने शाळेत उपस्थित होते. इयत्ता नववी ते बारावी वर्गांना अध्यापन करणाऱ्या 3519 शिक्षकांपैकी 3313 शिक्षकांची covid-19 चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 69 शिक्षक कोरोना पॉजिटीव्ह निघाले आहेत.
तसेच माध्यमिक शाळांमधील 1373 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी 1200 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची covid-19 चाचणी करण्यात आली असून त्यामध्ये 14 शिक्षकेतर कर्मचारी कोरोना पॉझिटिव निघाले आहेत. उर्वरित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पूर्ण करण्यात येत आहे. शाळेत उपस्थित सर्व 11733 विद्यार्थ्यांच्या पालकांचे आपल्या पाल्यास शाळेत पाठविण्याबाबत संमतीपत्रही भरून घेण्यात आले आहे. सर्व शाळा व शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला असून सर्व वर्गखोल्या सॅनिटाइझ करून घेण्यात आलेल्या आहेत.
सीईओ डॉ. विजयकुमार फड यांची विविध शाळांना भेटी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी आज शाळेच्या पहिल्या दिवशी पारगाव कन्या प्रशाला पारगाव, ता. वाशी, सरस्वती विद्यालय येरमाळा ता. कळंब व जनता विद्यालय येडशी, ता. उस्मानाबाद या शाळांना भेटी देऊन सर्व शालेय परिसर, वर्गखोल्या व covid-19 च्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्यासाठी शाळेत केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली व उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) गजानन सुसर हे देखील उपस्थित होते.