धक्कादायक : आळणीच्या स्वाधार मतिमंद मुलींच्या वस्तीगृहातील 51 मुली कोरोना पॉजिटीव्ह

उस्मानाबाद - उस्मानाबादपासून जवळच असलेल्या आळणी येथील स्वाधार मतिमंद मुलींच्या वस्तीगृहातील 51 मुली कोरोनाबाधित आढळल्या असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या वस्तीगृहाला जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि संबंधित अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
शुक्रवारी वसतिगृहातील काही मुलींना सर्दी व ताप आल्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर वडगावे यांना माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र येडशी अंतर्गत आरोग्य वर्धनी उपकेंद्र आळणी येथील आरोग्य पथकाने भेट देऊन 61 जणांची तपासणी केली. त्यात 45 विद्यार्थिनी व 16 शिक्षक व इतर स्टाफ़चा समावेश होता. 45 विद्यार्थिनी पैकी 25 विद्यार्थीनी पॉजिटीव्ह आढळल्या तर सोळा स्टाफ़ पैकी दोन स्टाफ पॉजिटीव्ह आढळला.
पुन्हा आज दिनांक ८ मे रोजी उरलेल्या 64 मुलींची तपासणी करण्यात आली. त्यात 26 मुली पॉजिटीव्ह आढळल्या. अशा वस्तीगृहातील एकूण 51 मुली व दोन स्टाफ पॉझिटिव्ह आढळले असून त्या सर्वांना आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार व मार्गदर्शनाखाली स्वतंत्र वस्तीगृहामध्ये ठेवण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती चांगली असून कोणालाही गंभीर लक्षणे नाहीत.
दरम्यान, आज जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉक्टर वडगावे, तहसीलदार गणेश माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल सूर्यवंशी यांनी भेट देऊन पाहणी केली व प्रत्यक्ष मूलीसोबत संवाद साधून त्यांच्या तपासणीबाबत व नोंदीबाबत स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी आळणी गावचे सरपंच वीर, पोलीस पाटील श्रीमाळी, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉक्टर ज्योती बिरादार , आरोग्य सेवक कुंभार, आरोग्य सेविका श्रीमती टेकाळे , संस्थेचे चव्हाण तसेच ग्रामसेवक तलाठी सर्वजण उपस्थित होते.
वस्तीगृहातील मुलींच्या विशेष गरजा लक्षात घेऊन त्यांना इतरत्र हलवून गैरसोय करण्यापेक्षा त्यांना त्याच वस्तीगृहात स्वतंत्रपणे आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली काळजी घेतली जाणार आहे तसे लहान मुलांमध्ये करोना हा धोकादायक ठरत नाही तरीपण त्यांच्या सर्व रक्त तपासण्या दैनंदिन ऑक्सीजन तपासणी तसेच ताप तपासणी इत्यादी नियमित करून सर्वतोपरी काळजी घेणार असल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले तसेच जिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांचा सल्लाही घेतला जाणार असून एक पथक भेट देऊन उपचाराबाबत सल्ला देणार आहे.