उस्मानाबादचे सायबर पोलीस आणि बोगस वेबसाईट चालवणाऱ्या आरोपींचे साटेलोटे ...
![d](https://osmanabadlive.com/static/c1e/client/83983/uploaded/fe8f78400c8833f78d96889dc892cd54.png)
उस्मानाबाद - महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवीच्या नावाने ऑनलाईन बाजार मांडणाऱ्या https://www.tuljabhavani.in/ यासह पाच बोगस वेबसाईटवर गुन्हा दाखल होवून आज सात दिवस झाले तरी या प्रकरणी एकही आरोपी सायबर पोलिसांनी अटक केला नाही. त्यामुळे आरोपी आणि पोलीस यांचे साटेलोटे झाले की काय ? असा सवाल तक्रारदार बाळासाहेब सुभेदार यांनी विचारला आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नावे बोगस वेबसाईट काढून भाविकांची फसवणूक करून आर्थिक लूट केली जात होती. याप्रकरणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चौकशीचे आदेश दिले होते. जिल्हाधिकाऱ्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले होते की, महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर ची अधिकृत वेबसाइट https://shrituljabhavani.org/ आहे. मात्र कुणी तरी अज्ञात लोकांनी https://www.tuljabhavani.in/ ही वेबसाइट सुरु करून भाविकांची लूट सुरु केली आहे. या वेबसाइटवर पूजा प्रसाद सेवा ही कॅटेगिरी दिली आहे. त्यावर क्लिक केले की, अभिषेक, अलंकार महापूजा, खण -नारळ ओटी पूजा , जागरण गोंधळ, अन्नदान अश्या पूजा येतात. त्यानंतर पे फॉर प्रसाद सेवा म्हणून ऑप्शन येते, त्यावर क्लिक केले की, फोन नंबर मागितला जातो, आणि नंतर फॉर्म भरून पैसे वसूल केले जातात. मंदिर संस्थानची अधिकृत वेबसाईट समजून लोक ही वेबसाइटच्या माध्यमातून पैसे पाठवत आहेत आणि त्यांची लूट केली जात आहे. याबाबत उस्मानाबाद लाइव्हवर सर्वप्रथम बातमी प्रकाशित झाली होती.
चौकशीमध्ये असे निष्पन्न झाले की, एकूण पाच वेबसाइट भाविकांची फसवणूक करीत आहेत. कोरोना काळात मंदिर बंद असताना तसेच पूजा विधी बंद असतानाही या वेबसाईट चालकांनी भाविकांकडून ऑनलाइन पैसे उकळले. त्यानुसार श्री तुळजाभवानी देवीच्या नावे बोगस वेबसाइट काढून भाविकांची फसवणूक करणाऱ्या https://www.tuljabhavani.in/ या वेबसाइटसह २ https://tuljabhavanipujari.com / ३ https://www.tuljabhavanimandir.org/ ४. https://shrituljabhavani.com/ ५. https://epuja.co.in/ या पाच वेबसाईटवर भादंवि ४२०, ६६ c , ६६ d नुसार तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये २३ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर तपास उस्मानाबादच्या सायबर पोलिसांकडे सोवण्यात आला आहे.
पोलीस आणि आरोपींचे साटेलोटे ?
गुन्हा दाखल होवून आज सात दिवस झाले तरी सायबर पोलिसांनी अद्याप एकही आरोपी अटक केला नाही. त्यामुळे आरोपी आणि पोलीस यांचे साटेलोटे झाले का ? असा सवाल तक्रारदार बाळासाहेब सुभेदार यांनी केला आहे.
तक्रार अर्जात एका वेब डेव्हलपरचा तसेच वेबसाईट चालवणाऱ्या पुजाऱ्याचा पत्ता आणि मोबाइल नंबर दिला होता. तसेच अन्य चार वेबसाइटवर सर्वांचे मोबाइल नंबर असताना सायबर पोलीस कश्याची वाटत पाहत आहेत, असा सवालही सुभेदार यांनी विचारला आहे.
आरोपीना अटक करण्यात पोलीस दिरंगाई करीत असल्याने गुन्हा दाखल झालेल्या वेबसाइटवर छेडछाड होत आहे. असे झाले तरी सर्व आरोपी मोकाट सुटण्यची शक्यता आहे., असेही सुभेदार म्हणाले.