उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयाबाबत मंत्रालयात आढावा बैठक

 प्रस्ताव भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे तातडीने पाठवण्याचे निर्देश
 
s

उस्मानाबाद  - उस्मानाबाद येथे नव्याने उभाराव्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे (एनएमसी) वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत सादर करण्यात यावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी  दिले आहेत. 

सदरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयाच्या संदर्भाने आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, उपसचिव संजय सुरवसे, आदी उपस्थित होते.


 
उस्मानाबाद येथे केंद्र शासनाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांप्रमाणे 100 प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 500 खाटांचे संलग्नीत रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे 25 एकर जागा लागणार आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी  यांनी महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी जागा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नावावर होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी अशा सूचना मंत्री अमित देशमुख यांनी बैठकी दरम्यान केल्या आहेत. 

 हे महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देणे गरजेचे आहे असे नमूद करून भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने दिलेल्या निर्देशानुसार वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी जागा निश्चित केल्यानंतर  आवश्यक असणारी जमीन ताब्यात घेणे, वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्या नावावर करुन घेणे या प्रक्रिया पार पाडणे गरजेचे  असे मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

From around the web