बेमुदत धरणे आंदोलनाचा तंबू  पोलिसांनी उखडून टाकला

हे मुघलापेक्षा वाईट आणि इंग्रजांपेक्षाही काळे सरकार - आचार्य तुषार भोसले 

 
बेमुदत धरणे आंदोलनाचा तंबू  पोलिसांनी उखडून टाकला

तुळजापूर - तुळजापूर मंदिर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिरासाठी आंदोलन करणारे  भाजप अध्यामिक आघाडीचे कार्यकर्ते संपतो  झाले आहेत.हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा, असे खुले आव्हान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिले आहे.राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याच्या मागणीसाठी भाजप अध्यामिक आघाडीच्या वतीने गुरुवारपासून तुळजाभवानी मंदिर महाद्वारासमोर सुरू करण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा तंबू  पोलिसांनी उखडून टाकला आहे. तसेच मंदिर परिसरात कलम १४४ लागू  करण्यात आले आहे. तसेच आयोजक आचार्य तुषार भोसले नगराध्यक्ष सचिन रोचकरी,विशाल रोचकरी,आनंद दादा कंदले, विनोद गंगणे, इंद्रजित साळुंखे,अविनाश गंगणे ,नितीन काळे, संतोष बोबडे यांच्यावर सपोनि सुशीलकुमार चव्हाण यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


त्यानंतर  पत्रकार परिषदेत आचार्य भोसले यांनी आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. पोलिसांनी पुढील १५ दिवस मंदिर परिसरात कलम १४४‍‍ लावण्याचा इशारा दिल्याने याचा दुरवरून महाद्वार दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तसेच गेल्या ८ महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने उपासमारीची झळ सोसणाऱ्या व्यावसायिकांना त्रास होऊ नये, त्यांच्या पोटावर पाय येऊ नये, केवळ ह्यासाठी धरणे आंदोलन स्थगित करण्यात येत आहे. आम्ही अटक होण्यास भीत नाही, असे आचार्य भोसले यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील साधूसंतांशी चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा येत्या २ दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. तसेच शांततेचे आंदोलन नाकारल्याने यापुढे असहिष्णु मार्गाने आंदोलन केल्यास काही अनुचित प्रकार घडल्यास याला ठाकरे सरकार जबाबदार असेल असा इशारा आचार्य भोसले यांनी यावेळी दिला. ‘मुह मे राम बगल मे छूरी’ तुमचा चेहरा उघडा झाला असल्याचा आरोप आचार्य भोसले यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर केला.

५ वर्षे सरकार चालवून दाखवा
विरोधात बोलणाऱ्या पत्रकार, साधू-संतांचे आवाज दाबले जात असून, राज्यात आणीबाणी आहे. इंदिरा गांधींनी यापूर्वी आणीबाणी लागू केली होती. सध्याही त्यांच्याच पक्षाच्या सांगण्यावरून सरकार काम करतेय.आकड्यांचा गेम करून सत्तेत आलेले हे सरकार असून ५ वर्षे सरकार चालवून दाखवा, असे आव्हान आचार्य भोसले यांनी यावेळी दिले.

हे मुघलापेक्षा वाईट आणि इंग्रजांपेक्षाही काळे सरकार

लोकशाही मार्गाचा अवलंब करत शांततेत सुरू असलेले आंदोलन रातोरात तंबू हटवून टाकत उधळून लावले. साधू संतांना कलम १४४ च्या नोटिसा दिल्या. लोकशाहीने दिलेल्या शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार हिसकावून घेणारे हे सरकार मुघलांपेक्षा वाईट आणि इंग्रजापेक्षाही काळे आहे. शासनाच्या या कृत्याचा सर्व साधू-संत काळ्या फिती लावून निषेध करत असल्याचे आचार्य भोसले यांनी या वेळी बोलताना सांगितले.

तुळजापुरात तणावपूर्ण शांतता
मुळातच परवानगी नसताना आंदोलन सुरू असल्याने गुरुवारी दिवसभर आंदोलनस्थळी तणावपूर्ण शांतता होती. भाजपने अाध्यात्मिक आघाडीला पुढे करत आंदोलनाचे घोडे दामटल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. आंदोलनस्थळी तगड्या बंदोबस्तासह वरिष्ठ पोलिस, महसूल अधिकारी तळ ठोकून होते.

दरम्यान मंदिर परिसरात कलम १४४ लागू करत मंदिराकडे येणाऱ्या सर्वच मार्गावर ४० मीटर परिघात बॅरिकेडिंग लावून रस्ते रोखण्यात आल्याने मंदिर परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. शहरातील सर्वच प्रमुख मार्गावर बॅरिकेडिंग लावून तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आचार्य भोसले आणि सहकाऱ्यांना पोलिस बंदोबस्तातच पुजारी मंडळ मंगल कार्यालयात आणण्यात आले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विशाल रोचकरी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

From around the web