पैसे द्या, पीएम किसान योजनेचा सन्मान निधी उचला...
उस्मानाबाद - जे श्रीमंत आहेत पण शेती १ हेक्टर ( अडीच एकर ) पेक्षा कमी आहे आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी उचलतात अशा आयकरपात्र शेतकऱ्यांकडून सदरची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.दुसरीकडे पैसे देणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला जात आहे. उस्मानाबादच्या तहसील कार्यालयात कर्मचारी उघड - उघड पैसे घेत असल्याचा व्हिडीओ उस्मानाबाद लाइव्हच्या हाती लागला आहे.
केंद्र शासनाने देशभरातील अल्पभुधारक शेतकऱ्यांना दिलासा, मदतीचा हात देण्यासाठी गतवर्षी पीएम किसान योजनेंतर्गत एका वर्षात तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी मार्फत सहा हजार रुपये जमा करण्यास प्रारंभ केला आहे. त्यानुसार आतापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांची रक्कम खात्यावर जमा झाली आहे.
परंतु, एका पाहणीत अनेक गर्भश्रीमंत, लाखो, हजारो रुपयांचा आयकर भरणारेही या योजनेत केवळ ते कुठेतरी अल्पभुधारक आहेत, सातबारावर आहेत म्हणून तेही या योजनेत पात्र ठरले आहेत. परंतु, ही योजना सर्वसामान्य अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी असल्याने अशा अपात्र लाभार्थ्यांकडून वितरीत झालेली रक्कम परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच या योजनेंतर्गत निधी वितरीत करताना काही चुकीच्या खात्यावर, अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अथवा मृत शेतकऱ्यांच्या खात्यावरही ही रक्कम अदा झाली आहे. अशा रकमाही परत घेण्याची प्रक्रिया महसूल प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक पडताळणीत कृषी विभागाकडून अशा जिल्ह्यातील ४८ हजार ५३१ शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली असून त्यांची पडताळणी करून त्यांना नोटीस काढल्या जाणार आहेत.
पैसे दिले की लाभ मिळणार
उस्मानाबाद तालुक्यात जवळपास ९ हजार बोगस लाभधारक आहेत. या बोगस शेतकऱ्यांना जो निधी जातो तो बंद करण्याऐवजी जे शेतकरी पैसे देतात, त्यांची नावे कायम ठेवली जात आहेत. त्यासाठी गावपातळीवर कोतवाल पासून दलाल नेमण्यात आले आहेत. त्यासाठी एक साखळी तयार करण्यात आली असून, यात अनेक वरिष्ठ अधिकारी गुंतले आहेत.
एकाच कुटुंबात पाच जणांना लाभ
पीएम किसान योजनेंतर्गत एका वर्षात तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी मार्फत सहा हजार रुपये जमा होण्यास प्रारंभ झाल्यानंतर अनेकांनी शक्कल लढवली. वडील, दोन भाऊ, एकत्र राहतात. मग वडिलांच्या नावे दहा एकर शेती असेल तर वडील, त्यांची पत्नी, दोन भाऊ यांच्या नावावर प्रत्येकी १ हेक्टर शेती करण्यात आली. अश्याच पद्धतीने शेती कितीही असली तरी कुटुंबातील प्रत्येकाच्या नावावर शेती करण्यात आली. तसेच पीक विमा भारतानाही याचा लाभ उचलण्यात आला. जे श्रीमंत आहेत, एकाच कुटुंबात राहतात आणि शेतीची वाटणी करून लाभ उचलतात अश्या बोगस शेतकऱ्यांच्या वसुल्या सुरु करण्यात आल्या आहेत. जे बोगसगिरी करून अनुदान उचलतात आशयावर सुद्धा सरकारची नजर आहे. परंतु उस्मानाबादच्या भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळत नाही आणि जे बोगसगिरी करतात त्यांना लाभ मिळत आहे.
चौकशीची मागणी
उस्मानाबाद तहसील कार्यालयातील अधिकारी या योजनेत हात धुवून घेत आहेत. जे शेतकरी पैसे देतात त्यांना लाभ मिळवून देत आहेत. जे बोगस आहेत त्यांची नावे पैसे घेऊन कायम ठेवली जात आहेत. त्याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केली आहे.
पाहा व्हिडीओ