उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वीत 

३५० रूग्णांना ऑक्सिजन मिळणार 
 
उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वीत

उस्मानाबाद -  संयुक्त मुख्य विस्फोटक नियंत्रक, विस्फोटक विभाग, भारत सरकार यांची जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पास लागणारी ना हरकत परवानगी मिळाली.असून हा  प्रकल्प आजपासून कार्यान्वीत झाला आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ऑक्सिजन सुविधेसह जिल्ह्यातील एकमेव उपचार केंद्र असून हा ऑक्सिजन प्रकल्प ७७०० घनमीटर क्षमतेचा आहे, हा प्रकल्प परवाना आणि ना हरकत प्रमाणपत्र न दिल्या मुळे चालू झालेला नव्हता. दि.16 एप्रिल रोजी संयुक्त मुख्य विस्फोटक नियंत्रक, विस्फोटक विभाग, भारत सरकार यांना खासदार ओमराजे यांनी पत्र देऊन ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली होती व सातत्याने पाठपुरावा केला  होता. या अनुषंगाने आज परवानगी मिळाली आहे.

 हा प्रकल्प १० के.एल. क्षमतेचा असून तो कार्यान्वित करण्यासाठीच्या चाचण्या यापूर्वीच पूर्ण झाल्या होत्या. आज आवश्यक त्या परवानग्या व ना हरकत प्राप्त झाल्यानंतर लिक्विड ऑक्सिजन भरून आज पासून हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. 

या प्रकल्पास खासदार ओमराजे निंबाळकर. आमदार कैलास घाडगे-पाटील, डॉ.जयप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कोस्तुभ दिवेगावकर, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, जिल्हा शल्यचिकित्सक डी.के.पाटील तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या प्रकल्पाद्वारे सध्या ३५० रूग्णांना ऑक्सिजन पुरविला जाऊ शकतो. या उपचार केंद्रात नवीन ४० खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांवर सहज उपचार करता येतील व सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. 

 कोरोना बाधित रुग्णांना दिलासा.-  पालकमंत्री शंकरराव गडाख

उस्मानाबाद  जिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन निर्मिती प्लांट कार्यानवीत झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील अन्य शासकीय, खासगी रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्यासंदर्भात उपाय योजना सुरू असून रुग्णाने आणि त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले आहे. 

 जिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन प्लँट तात्काळ पूर्ण व्हावा यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. याबाबत आवश्यक असणाऱ्या सर्व मंजुरी घेणे, प्लॅन चा सेटअप उभा करणे, याबाबत पाठपुरावा सुरू होता. प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून योग्य त्या सूचना देऊन हा प्लँट कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 350 ते 400 कोरोना रुग्णांना आता पुरेसा ऑक्सिजन यातून मिळणार आहे. जिल्हा रुग्णालयातील या प्रकल्पाची क्षमता दहा मेट्रिक टन असून रुग्णालयातच ऑक्सिजन उपलब्ध झाल्याने जिल्ह्याच्या इतर उपजिल्हा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयांना पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध होणार आहे.

 या शिवाय रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करत असताना ऑक्सीजन सिलेंडर अथवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट गरजेचे असतात. त्यासाठीही पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तात्काळ खरेदी करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. लवकरच  ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर रुग्णांच्या सेवेत उपलब्ध होतील. त्यामुळे  ऑक्सीजनची आवश्यकता असलेल्या रुग्णाला यामुळे दिलासा  मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या उपाय योजनामध्ये चांगली भर पडली असून नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे.

From around the web