उस्मानाबादचे शिवसेना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल 

 
उस्मानाबादचे शिवसेना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल
न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घे म्हणून  नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी घरात घुसून मारहाण केल्याची तक्रार शिवसेना शहर उप प्रमुख प्रशांत ( बापू ) साळुंके  यांनी पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. 

उस्मानाबाद - मुंबई उच्च  न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल असलेली याचिका मागे घे म्हणून उस्मानाबादचे शिवसेना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी, घरात घुसून मारहाण केल्याची तक्रार शिवसेना शहर उप प्रमुख प्रशांत ( बापू ) साळुंके यांनी आनंदनगर पोलीस स्टेशन मध्ये  केली आहे. पोलिसांनी राजेनिंबाळकर यांच्यासह तिघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. 


प्रशांत ( बापू ) साळुंके यांनी पोलीस स्टेशन मध्ये  दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , मुंबई उच्च  न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आपण उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने अण्णाभाऊ साठे दलित वस्ती नागरिक सुधार योजना अंर्तगत करण्यात आलेल्या कामात पाच कोटी रुपयाचा घोटाळा  झाल्याची याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशावरून जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असताना, उस्मानाबादचे शिवसेना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, विजय उर्फ बाबा खडके, प्रदीप उर्फ पिंटू घोणे असे तिघेजण गुरुवार दि. १२ नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहा वाजता बोलेरो गाडीतून आपल्या स्व. बाळासाहेब ठाकरे नगर ( काकडे प्लॉट ) मधील राहत्या घरी आले आणि तू हायकोर्टात दाखल  केलेली याचिका मागे घे म्हणू लागले. यावेळी  याचिका मागे  घेणार नाही म्हटल्यानंतर  नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी मानेला पकडून गालावर चापटा लगावल्या तसेच शिवीगाळ करून जीवे  मारण्याची धमकी दिली. शिवसेना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यापासून आपल्या जीवितास धोका असल्याचेही प्रशांत ( बापू ) साळुंके यांनी म्हटले आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी शिवसेना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, विजय उर्फ बाबा खडके, प्रदीप उर्फ पिंटू घोणे यांच्या विरुद्ध भादंवि ४५२, ३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

काय आहे याचिका ? 

उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने सन  २०१९- २० मध्ये अण्णाभाऊ साठे दलित वस्ती नागरिक सुधार योजना अंर्तगत करण्यात आलेली कामे बोगस आहेत असे याचिकाकर्ते प्रशांत ( बापू ) साळुंके यांचे म्हणणे आहे. 

बनावट दस्तऐवज  तसेच बोगस निविदा प्रक्रिया करून पाच कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे.याबाबत मुंबई उच्च  न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल आहे, न्यायालयाने ही  याचिका दाखल करून घेतली असून, जिल्हाधिकाऱ्याना चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. 

विशेष म्हणजे  नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर शिवसेनेचे असून, याचिकाकर्ते प्रशांत ( बापू ) साळुंके शिवसेना शहर उप प्रमुख आहेत. त्यामुळे सामना रंगला आहे. 

From around the web