खासगी हॉस्पिटल आणि क्लिनिक सुरु न केल्यास नोंदणी रद्द

 
 खासगी हॉस्पिटल आणि क्लिनिक  सुरु न केल्यास नोंदणी रद्द

उस्मानाबाद - कोरोनाच्या धास्तीने जिल्ह्यातील अनेक खासगी हॉस्पिटल आणि क्लिनिक बंद आहेत. कोरोनापासून खासगी डॉक्टरांनी पळ काढल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांनी तातडीने आपले हॉस्पिटल आणि क्लिनिक सुरू करून  २४ तास सेवा द्यावी अन्यथा नोंदणी रद्द करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील बऱ्याच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या रुग्णालयातील बाहयरुग्ण सेवा बंद केली असल्याचे व त्यामुळे जिल्हाभरातून येणा-या रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले असून तशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तरि जिल्ह्यातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्या रुग्णालयात आवश्यकतेनुसार बाहयरुग्ण सेवा व  24 तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे  यांनी दिले आहेत.

     या आदेशानुसार या पुढील काळात   खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी  त्यांच्याबाबत कोणत्याही स्वरूपाची तक्रार होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी . जर रुग्णांना जरुरीची बाहयरुग्ण सेवा व 24 तास अत्यावश्यक सेवा न मिळाल्यास संबंधित खासगी व्यावसायिकांचे बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत करण्यात आलेली नोंदणी रद्द करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी, असे निर्दश जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी दिलेत.

      जिल्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेश लागू आहेत. तसेच भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार दिनांक 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन चे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 30 मधील तरतुदीनुसार तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे दिनांक 14 मार्च 2020 च्या अधिसूचने मधील महाराष्ट्र कोविड-19 उपाय योजना नियम,2020चे नियम 11 नुसार आणि भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र असतील असे श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी सूचित केले. या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून संपूर्ण जिल्ह्यात लागू होत आहे.

From around the web