उस्मानाबाद : २७९ पैकी ४० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द

 


प्रशासकीय कारणामुळे झालेल्या बदल्या रद्द झाल्याने आश्चर्य 

 उस्मानाबाद : २७९ पैकी ४० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द

विशेष पोलीस महानिरीक्षकाकडून कानउघाडणी 


उस्मानाबाद - उस्मानाबाद पोलीस दलातील २७९ पोलीस कर्मचाऱ्यांच्या  प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ४० जणांच्या  बदल्या रद्द करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, या बदल्या रद्द का करण्यात आल्या, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. दरम्यान याप्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक ( औरंगाबाद परिक्षेत्र ) यांनी, उस्मानाबादच्या साहेबांची कानउघडणी केल्याचे समजते. 


महाराष्ट्र शासनाच्या गुह विभागाच्या निर्णयानुसार पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या पत्रानुसार उस्मानाबाद पोलीस आस्थापना मंडळाच्या निर्णयानुसार उस्मानाबाद पोलीस दलातील २७९ पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदल्याचा आदेश क्र. २०२०/ १३५०९ दि. २९/९/२०२० आहे. 


प्रशासकीय कारणास्तव बदली झाली असताना, पैकी ४० पोलीस कर्मचाऱ्यांना आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आले. त्यात स्थानिक गुन्हे शाखेतील चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या बदल्या का रद्द करण्यात आल्या ? याची दबक्या  आवाजात चर्चा सुरु आहे. दुसरीकडे तुळजापूरचे पोलीस निरीक्षक साईनाथ उर्फ एस.आर.ठोंबरे आणि उमरग्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे  यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली होती. याप्रकरणी दोघांनी मॅटचा दरवाजा ठोठावला आहे. 


काही दिवसापूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक ( औरंगाबाद परिक्षेत्र )  उस्मानाबाद दौऱ्यावर आले होते, त्यांनी या बदल्या प्रकरणात उस्मानाबादच्या साहेबांची चांगलीच कानउघडणी केल्याचे समजते.तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकांनाही धारेवर धरल्याचे कळते. त्याची पोलीस वर्तुळात चवीने चर्चा सुरु आहे. 

From around the web