गालबोट : उस्मानाबाद जिल्ह्यात एक कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण

 

गालबोट : उस्मानाबाद जिल्ह्यात एक कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल ३७ दिवसानंतर कोरोना बाधित एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे ग्रीन झोनला गालबोट लागले आहे. हा रुग्ण परंडा येथे सापडला असून, तो पिकप टेम्पो चालक आहे. हा पिकप टेम्पो चालक ३० वर्षाचा असून तो मागील काही दिवसापासून  परंडा येथून पुणे तसेच नवी मुंबई येथे जात होता. तो  पिकप टेम्पो मधून टरबूज तसेच अन्य फळांची वाहतूक करीत होता. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता, त्याचा रिपोर्ट कोरोना पॉजिटीव्ह आला आहे. त्याला उपचारासाठी परंडा उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली.

हा पिकप टेम्पो चालक आजपर्यंत कुणाकुणाच्या संपर्कात आला, याची शोध मोहीम सुरु झाली आहे. तसेच कोरोनाचा एक रुग्ण सापडल्यामुळे परंडा शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.


उस्मानाबाद जिल्हा रविवार पर्यंत ग्रीन झोन मध्ये होता. मागील एक महिन्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसल्यामुळे नागिरकांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी सर्व व्यवहार सुरु करण्यास शनिवारी परवानगी दिली. त्यानुसार आज सर्व व्यवहार सुरु झाले होते तसेच  एसटी बस सेवा देखील सुरु झाली आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी तीन कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण सापडले होते, परंतु ते पूर्णपणे बरे झाले होते. त्यानंतर ३७ दिवसानंतर कोरोनाने उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा एंट्री केली आहे. त्यामुळे ग्रीन झोनला गालबोट लागले आहे.

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयात मार्फत 9 व्यक्तींच्या स्वाबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आठ व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आलेले असून एका व्यक्तीच्या अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

From around the web