उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी एक कोरोना रुग्ण सापडला
Apr 3, 2020, 00:34 IST
उस्मानाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी दोन रुग्ण सापडल्याने खळबळ
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात आणखी एक कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण सापडला असून, जिल्ह्यात एकाच दिवशी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. दुसरा रुग्ण लोहारा तालुक्यातील धानोरी येथील राहणार असून तो काही दिवसांपूर्वी मुंबई येथून आला होता.
उमरगा तालुक्यातील बलसूर येथील एका ३१ वर्षे तरुणाला कोरोना झालेल्या वृत्ताची शाई वाळते न वाळते तोच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
बलसूरचा तरुण पानिपत, दिल्ली येथून आला आहे तर दुसरा कोरोना बाधित तरुण मुंबई येथून आला असून तो मुंबईच्या ताज हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करत होता, अशी प्राथमिक माहिती आहे.
लोहारा तालुक्यातील धानुरी गावचे जवळपास अनेक तरूण मुंबईत ताज हाॅटेलमध्ये कामाला आहेत. त्यातील २० ते २५ जण या संशियताप्रमाणेच पळून आल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. अत्यावश्यक सेवेचा या संशयित रुग्णाने फायदा घेतला असुन ताज हाॅटेल वरुन त्याने वाशी मार्केटला येऊन तेथील संत्राच्या गाडीतुन थेट जळकोट व पुढे टमटम मधुन तो त्याच्या धानुरी गावाला पोहचल्याचे सांगितले जात आहे.
या रुग्णाच्या संपर्कातील 25 जणांची यादी प्रशासनाने तयार केली असून त्यांना गावातील शाळेत ठेवण्यात आले असून त्यांची स्वॅब तपासणी होणार आहे तर कोरोना बाधित रुग्णाला तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.
मुंबई येथील आलेल्या रुग्णाची स्वॅब घेतल्यानंतर त्याचा रिपोर्ट येण्याअगोदर घरी सोडलेच कसे ? हा प्रश्न निर्माण झाला असून या निमित्ताने आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
सदर तरुण मुंबईहून येणेगूर पर्यंत भाजीपाला गाडीत प्रवास करीत आला व त्यांनतर दुधाच्या वाहनात बसून गावी धानोरी येथे गेला असे समोर आले आहे.