उस्मानाबाद जिल्ह्यात दोन स्वस्त धान्य दुकानदाराचे परवाने रद्द

 
उस्मानाबाद जिल्ह्यात दोन स्वस्त धान्य दुकानदाराचे परवाने रद्द


लोहारा  : एकीकडे कोरोनामुळे गोरगरीब जनता संकटात सापडली असताना, स्वस्त धान्य दुकानदारानी मापात पाप करणे सुरु केले आहे. इतकेच नव्हे तर  स्वस्त धान्याची अतिरिक्त दराने विक्री करीत असल्याचे आढळून आले आहेत. याच कारणामुळे तालुक्यातील आष्टाकासार येथील दोन स्वस्त धान्य दुकानाचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. ही कारवाई तहसीलदार विजय अवधाने यांनी शनिवारी (ता.११) केली आहे. या कारवाईमुळे रेशन दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

तालुक्यातील आष्टाकासार येथील मल्लिनाथ सोलापुरे यांना स्वस्त धान्य दुकान क्रमांक एक व तीन अशा दोन दुकानांचा धान्य विक्री परवाना देण्यात आला आहे. गरीब लाभार्थी येथून स्वस्त धान्य घेऊन जातात; परंतु मागील काही वर्षभरापासून स्वस्त धान्य दुकानदार अतिरिक्त दराने धान्याची विक्री करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. शिवाय २६ जानेवारीला घेण्यात आलेल्या ग्रामसभेत संबंधित रेशन दुकानदाराला तंबी दिली होती; पंरतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यातच कोरोना संसर्गामुळे देश लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्वच व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाचे हाल होत आहेत.

अशा स्थितीत शासनाच्या स्वस्त धान्याचा आधार गरिबांना मिळतो. परंतु, स्वस्त धान्य दुकानदार शासनाने ठरवून दिलेल्या किमतीत विक्री न करता अधिक दराने विक्री करून लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करणे, कोणत्याही प्रकारची पावती न देणे, लोकांच्या अज्ञानपणाचा फायदा घेत त्यांचे अंगठे घेऊन धान्य कमी देत असल्याची तक्रार देत दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत, ग्रामदक्षता समितीकडे करण्यात आली होती.

त्यानुसार समितीचे अध्यक्ष तथा सरपंच सुनील सुलतानपुरे, सदस्य सचिव तलाठी व्ही. व्ही. आवारे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी मागच्या आठवड्यात प्रत्यक्ष जाऊन दोन्ही स्वस्त धान्य दुकानांचा पंचनामा केला. या पंचनाम्याचा अहवाल ग्राम दक्षता समितीने तहसीलदारांना पाठविला. अहवालाचे अवलोकन करून तहसीलदार विजय अवधाने यांनी शनिवारी या दोन्ही दुकानांचे परवाना रद्द करण्याची कारवाई केली आहे.

रेशन दुकानदारांनी शासनाने ठरवून दिलेल्या किमतीतच धान्याची विक्री करावी. सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मोफत तांदूळ देण्यात येत आहे. त्याचे वितरण सुरळीत व प्रत्येक कुटुंबाला मिळेल, याकडे दुकानदारांनी लक्ष द्यावे, एखाद्या लाभार्थ्याची तक्रार आली तर दुकानचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- विजय अवधाने, तहसीलदार, लोहारा. 

From around the web