दिलासा :कळंबमधील तीन कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या २६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

 
दिलासा :कळंबमधील  तीन कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या २६ जणांचे रिपोर्ट  निगेटिव्ह


कळंब  :  तालुक्यातील तीन  रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह आढळून आल्यानंतर खळब्द उडाली होती, मात्र आता दिलासा मिळाला आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या २६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कळंब शहरातील एका महसूल कर्मचाऱ्यासह  तालुक्यातील पाथर्डी येथील दांपत्य अशा तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. या रुग्णांच्या संपर्कातील २६ जणांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. सर्वांचे अहवाल प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह आल्याने तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू असून, या ठिकाणी नियमित अहवाल पाठविण्याचे काम सुरूच आहे. कळंब तालुक्यात बाधितांची संख्या अचानक तीनवर गेल्याने प्रशासनाने कडेकोट टाळेबंदी केली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन दक्ष आहे. शहरातील एक आणि पाथर्डी येथील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब १४ मे रोजी उघड झाली होती. त्यानंतर दोघांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एका रुग्णाला उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तीनही रुग्णांचे मोबाईल लोकेशन ट्रॅक 
कोरोनाबाधित तीन रुग्ण कळंब तालुक्यात आढळून आले आहेत. त्यापैकी पाथर्डी येथील दोघे मुंबई येथून परतलेले होते. तर अन्य एक रुग्ण महसूल विभागाचा कर्मचारी असून, ते शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी आहेत.

प्रशासनाने घेतलेल्या माहितीवरून शहराबाहेर कुणीही गेलेले नाहीत. त्यामुळे शहरातील एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झालीच कशी, या चिंतेने प्रशासन हतबल झाले आहे.  कळंब शहरातच कोरोना संसर्गाने बाधित असलेले रुग्ण फिरत असल्याचा संशय बळावत आहे. दरम्यान, तीनही रुग्णांचे मोबाईल लोकेशन ट्रॅक करण्यात आले असून, त्यांचे लोकेशन शहर परिसरात असल्याचे उघड होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली आहे. प्रशासनाने टाळेबंदीची कडक अंमलबजावणी केली असून, ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या हालचालींवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहेत. टाळेबंदी ही चौथ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यातच कळंब तालुक्यात कोरोना संसर्गाच्या बाधितांची संख्या तीन झाली आहे.

या तिघांना कोरोनाची बाधा झालीच कोठून? या चिंतेने प्रशासन काळजीत पडले आहे. तिघांची हिस्ट्री प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोना संसर्गाची लागण झाल्याची एकही व्यक्ती उघडकीस आली नाही. मग संसर्ग झाला कोठून, असा प्रश्न आता कळंबकरांना पडला आहे.
शहरात दुकाने बऱ्यापैकी सुरू होती. या गर्दीत कोणतीही लक्षणे नसलेला कोरोनाबाधित फिरला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील बाधिताच्या संपर्कातील सर्वांबद्दल प्रशासन आवश्यक ती काळजी घेत आहे.

कोरोनाबाधितांच्या संपर्कातील २६ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी (ता. १६) बाधितांच्या संपर्कातील १२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
- डॉ. जीवन वायदंडे, वैद्यकीय अधीक्षक, कळंब 

From around the web