उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शासनाच्या मदतीकडे डोळा

 


 उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शासनाच्या मदतीकडे डोळा


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात १३ आणि १४ ऑक्टोंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर शरद पवार, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह चार मंत्री आणि १४ नेत्यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा केला, त्यानंतर ठाकरे सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केल्यानंतर बँक खात्यावर मदत केव्हा येणार ? याकडे शेतकऱ्यांचे आता  डोळे लागले आहेत. 


उस्मानाबाद जिल्ह्यात  १३ आणि १४ ऑक्टोंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन वाहून गेले, शेतातील बांध फुटून माती वाहून गेली. शेतजमीन खरडून निघाली. न भरून येणारे नुकसान झाले. तसेच अनेक शेतकऱ्यांची जनावरे मृत झाली.त्याचबरोबर अनेक घरांची पडझड झाली असून, संसारोपयोगी साहित्याची नासधूस झाली. 


उस्मानाबाद जिल्ह्यात न भूतो झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार यांनी दोन दिवसीय दौरा केला, त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा केला. त्याचबरोबर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्यासह चार मंत्री, विविध नेते यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा केला. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. जिरायत शेतकऱ्यासाठी हेक्टरी १० हजार आणि बागायत शेतकऱ्यासाठी २५ हजार रुपये देण्यात येणार आहेत, असे म्हटले आहे.  उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसगट  २ हेक्टरपर्यंत मदत मिळणार, असे सांगितले जात आहे. 


उस्मानाबाद  जिल्ह्यात पंचनामे  करण्याचे काम सुरु असताना महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे पंचनामे रखडले आहेत. दुसरीकडे राज्याच्या तिजोरीत रक्कम नाही. केंद्राचे पथक अजून राज्यात फिरकले नाही. दिवाळी अगोदर खात्यावर रक्कम जमा होणार, अशी घोषणा मुख्यमंत्र्यानी केली होती. एकंदरीत परिस्थिती पाहता  शेतकऱ्यांची दिवाळी गोड  होणार का ? याकडे लक्ष वेधले आहे. 

From around the web