सिव्हिल हॉस्पिटल : वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या बेफिकीर कारभाराची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी नियुक्त
May 13, 2020, 13:22 IST
उस्मानाबाद लाइव्ह आणि बाळासाहेब सुभेदार यांचा दणका
उस्मानाबाद लाइव्हने उघडकीय आणलेल्या एका प्रकरणाची चौकशी करण्यासासाठी उस्मानाबादचे आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांना निर्देश दिले होते. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी डॉ. नानासाहेब गोसावी, सर्जन, वर्ग १ यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सुभेदार यांच्या तक्रारीची सखोल चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल तात्काळ द्यावा, असा आदेश देण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण ?
उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी येथील ५५ ते ६० वयोगटातील एक व्यक्ती पिंपरी चिंचवड मध्ये आपल्या नातेवाईकाकडे गेला होता, गावी परत आल्यानंतर काही ग्रामस्थांनी कोरोनाच्या भीतीमुळे त्यास स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर १७ मार्च रोजी स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यास अब्युलन्सने जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे कोरोना संशयित रुग्ण म्हणून पाठवले, पण तो येथे आल्यानंतर कोरोना वार्डच बंद होता. तो एक तास त्या कोरोना वार्डसमोर उभा होता, पण कुणीही कर्मचारी फिरकला नाही.यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही, इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हात झटकले. काही कर्मचारी कोरोना संशयित रुग्ण म्हणून पळून गेले.
त्यानंतर उस्मानाबाद लाइव्हने पुराव्याच्या आधारे बातमी दिल्यानंतर त्यास कोरोना वार्ड मध्ये भरती करण्यात आले. त्यानंतर त्या व्यक्तीची तपासणी केली असता तो ठणठणीत निघाला, पण याप्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील गलथान कारभार समोर आला होता. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे एका निवेदनाव्दारे केली होती.