धक्कादायक : कोरोना बाधित रुग्ण उस्मानाबाद शहरात फिरला
May 28, 2020, 12:17 IST
अतिरिक्त शल्य चिकित्सकांची जिल्हाधिकाऱ्याकडून कानउघडणी
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एका कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एका संशयित रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले होते. त्याची कसलीही विचारपूस किंवा तपासणी करण्यात आली नाही, त्यामुळे तो रुग्ण कंटाळून रुग्णालयाच्या बाहेर पडला. तो अनेकांना भेटला असून त्यामुळे शहरात कोरोना रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दाखल घेतली असून, अतिरिक्त शल्य चिकित्सकांची कानउघडणी केली आहे.
तब्बल ३७ दिवस ग्रीन झोन मध्ये असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २७ मे अखेर जिल्ह्यात ५२ रुग्ण आढळून आले असून, त्यात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
घडले असे की, उस्मानाबाद शहरातील जोशी गल्लीतील एक रुग्ण कोरोना बाधित आढळून आल्यानंतर या रुग्णाच्या संपर्कातील लोकांना जिल्हा शासकीय रुग्णालयात आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले होते आणि त्यांचे स्वाब तपासणीसाठी लातूरला पाठवण्यात आले होते, पण रिपोर्ट येण्याअगोरच एक संशयित रुग्ण आयसोलेशन कक्षातुन बाहेर पडला आणि तो आपल्या आज्जीला आणि इतर काही लोकांना जावून भेटला. त्याहून धक्कादायक म्हणजे या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट कोरोना पॉजिटीव्ह आला आहे. हा रुग्ण जेव्हा आयसोलेशन कक्षात आला होता तेव्हा त्याची कसलीही विचारपूस किंवा औषधोपचार न केल्याने तो बाहेर पडला, पण त्याचा गंभीर परिणाम उस्मानाबाद शहरातील लोकांना भोगावा लागणार आहे.
उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांना जेव्हा हा प्रकार कळला, तेव्हा त्यांनी अतिरिक्त शल्य चिकित्सकांना लेखी समजपत्र देवून कानउघडणी केली आहे.
काय लिहिले समजपत्रात ...