विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आ. राणा पाटील यांच्या बंगल्यावर मुक्काम

 


दिल्या घरी सुखी राहा म्हटल्यामुळे शरद  पवार यांना अप्रत्यक्ष उत्तर !

 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आ. राणा पाटील यांच्या बंगल्यावर मुक्काम


उस्मानाबाद - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी, तुळजापूरच्या आजच्या पत्रकार परिषदेत आ. राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता, दिल्या घरी सुखी राहा ! असे म्हटले असताना, दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, उस्मानाबादच्या दौऱ्यात पाटील यांच्या बंगल्यावर  मुक्काम केल्याने पवार आता दूर तर फडणवीस खूप  जवळ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 


महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2019 ची रणधुमाळी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं होतं. अनेक निष्ठावान समजले जाणारे पवारांचे साथीदार भाजपवासी झाले होते. यात सर्वात मोठ नाव होतं ते म्हणजे डॉ. पद्मसिंह पाटील आणि राणा जगजीत सिंह पाटील. पाटील कुटुंबाने राष्ट्रावादीला सोडचिठ्ठी देणे पवारांच्या जास्तचं जिव्हारी लागलं होतं. कारण, पाटील कुटुंब केवळ पक्षाचे सदस्य नव्हेत तर पवारांचे नातेवाईकही आहेत. याच संदर्भातील एका प्रश्नामुळे नगर जिल्ह्यातील एका पत्रकार परिषदेत त्यांना भावना अनावर झाल्या होत्या. 


उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे  झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार हे रविवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या  दौऱ्यावर आले होते. रविवारी दिवसभर अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर सोमवारी सकाळी तुळजापूरच्या सर्किट हाऊसमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. 


सोडून गेलेले काही नेते परत येत आहेत ही चर्चा निश्चित आहे. त्याचा विचार आम्ही करत आहोत. पण तो करताना आम्ही काही भाग ठरवले आहेत. आता उदाहरणार्थ उस्मानाबाद. आम्ही इथे निकाल घेतला, इथे एन्ट्री नाही. गेलेत तिथे सुखी रहा, असं शरद पवारांनी हात जोडून सांगितलं. राणा जगजीत, पद्मसिंह या आप्तस्वकीयांनाच नो एन्ट्री असल्याचं शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलं होतं.


त्यावर आ. राणा जगजितसिंह पाटील यांना  प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले की , शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देणे योग्य वाटत नाही, त्यावर आपण काय  बोलणार ? 



फडणवीस राणा पाटील यांच्या घरी मुक्कामी 


उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोन दिवशीय उस्मानाबाद  दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी सायंकाळी त्यांनी परंडा तालुक्यातील काही गावांची पाहणी केली. त्यानंतर ते उस्मानाबादला मुक्कामी आले आहेत. उस्मानाबादला त्यांनी सर्किट हाऊसवर मुक्काम न करता आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या एमआयडीसी भागातील बंगल्यावर मुक्काम केला आहे. 


फडणवीस यांचे आ. पाटील यांच्या बंगल्यावर आगमन होताच त्यांनी पुष्पगुच्छ देवून  स्वागत केले. मा.देवेंद्रजी..आपले आमच्या निवासस्थानी सहर्ष स्वागत ! म्हणून आ. राणा पाटील यांनी एक छोटासा व्हिडीओ शेयर केला आहे. 

मा.देवेंद्रजी.. आपले आमच्या निवासस्थानी सहर्ष स्वागत...

Posted by Ranajagjitsinha Patil on Monday, October 19, 2020


आ. पाटील यांना  शरद पवार यांनी एकीकडे डिवचले असताना, देवेंद्र फडणवीस यांनी आ. पाटील यांच्या घरी मुक्काम करून पवारांना अप्रत्यक्ष उत्तर दिले आहे. 

 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आ. राणा पाटील यांच्या बंगल्यावर मुक्काम


From around the web