कोरोना बाधित बलसूर आणि धानुरी गाव अखेर सील

 
कोरोना बाधित बलसूर आणि धानुरी गाव अखेर सील

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात बलसूर ( ता. उमरगा ) आणि धानुरी ( ता. लोहारा) येथे काल कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू  नये म्हणून या दोन्ही गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणे सील केली असून, गावाच्या सीमा तसेच उमरगा तालुक्याच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत.

जिल्ह्यात कोरोनाग्रस्त दोन रुग्ण आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरून गेली आहे.महसूल आणि आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील बलसूर येथील संबंधित युवक आणि त्याची पत्नी दोघेही काही दिवसांपूर्वी पानिपत तसेच दिल्लीला फिरण्यासाठी गेले होते. मात्र, गावात परतल्यानंतर त्यांनी आरोग्य तपासणी केली नाही.


कोरोना बाधित बलसूर आणि धानुरी गाव अखेर सील

 गावकऱ्यांच्या आग्रहानंतर १ एप्रिल रोजी त्याचे स्वॅब नमुणे घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवारी सायंकाळी त्याचे रिपोर्ट उपलब्ध झाले. त्यात तो पॉजिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या पत्नीचा रिपोर्ट नॉर्मल आला असला तरी तो ज्या व्यक्तींच्या संपर्कात आला, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. बलसूरमधील जवळपास १५ जणांना प्रशासनाने आरोग्य तपासणीसाठी ताब्यात घेतले असून, यामध्ये युवकाच्या कुटुंबातील १० व्यक्तींचा समावेश आहे. गावाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तर 2 मेपर्यंत गावातील व्यक्तींना बाहेर जाण्यास किंवा बाहेरून गावात येणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे.

बलसूर पाठोपाठ धानुरी (ता. लोहारा) येथे कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने प्रशासनासह तालुक्यातील नागरिकांत खळबळ उडाली आहे. प्रशासन गुरुवारी (ता. २) रात्री दहापासून युद्ध पातळीवर कामाला लागले आहे. धानोरी गाव सील करण्यात आले आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या धानुरी व जेवळी येथील एकूण तेरा व्यक्तींवर उपचार करुन त्यांना विलगीकरणासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

धानुरी (ता. लोहारा) येथील जवळपास १५० नागरिक मुंबई येथील ताज हॉटेलच्या विविध युनिटमध्ये काम करतात. त्यातील एका कामगाराला क्वारंटाईन करण्यात आले असतानाही तो अवैध मार्गाने सोमवारी (ता. ३०) पहाटे दोन वाजता धानुरी येथे आला. तसेच याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली नाही. एवढेच नव्हे तर तो या दोन-तीन दिवसांत कुटुंबात, मित्रपरिवारासह गावात बेफिकिरपणे फिरला. शेतातील राशी करण्याबरोबरच शेतीला लागणारे साहित्य खरेदीसाठी गावालगतच्या जेवळी येथे ही गेला होता.


कोरोना बाधित बलसूर आणि धानुरी गाव अखेर सील

धानोरी येथील युवकाला कोरोना झाल्याचे रात्री उशिरा मुंबईतून जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले आहे. सदरील युवक मुंबईत ताज हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत होता. त्याची मुंबईत असतानाच तपासणी करण्यात आली होती.त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, दरम्यानच्या काळात तो भाजीच्या वाहनातून गावाकडे आला होता.गुरूवारी रात्री मुंबईतील प्रयोगशाळेतून रिपोर्ट आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्याचा शोध घेतला.त्याने दिलेल्या माहितीनुसार गावात आल्यानंतर त्याने शेतात पीकाच्या मळणीची कामे केली. यादरम्यान तो आजूबाजूच्या गावांमध्येही फिरला होता. तो ज्यांच्या संपर्कात आला, अशा लोकांना शोधून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

लॉकडाऊननंतर सर्व जिल्ह्याच्या सीमादेखील बंद करण्यात आल्या आहेत.असे असतानाही जिल्ह्याबाहेरून विशेषत: पुणे-मुंबईतून हजारो लोक गावाकडे येत आहेत. जिल्ह्याच्या सीमा बंद असताना छुप्या मार्गाने लोक गावात कसे येत आहेत.प्रशासकीय यंत्रणा काय करतेय, गावात आल्यानंतर या व्यक्तींची नोंद का केली जात नाही, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

उस्मानाबादेत दोन दिवसांचा जनता कर्फ्यु !

उस्मानाबाद जिल्ह्यात काल  कोरोणाचे २ रुग्ण आढळून आल्याने प्रशासनहादरून गेले आहे.कोरोनाच्या या जिल्हा प्रवेशाने प्रशासन अधिक गतिमान झाले असून उद्या दि.४ एप्रिल व ५ एप्रिल रोजी अत्यावश्यक सेवा (आरोग्य/मेडिकल) वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुंढे यांनी दिले आहेत.
शिवाय उमरगा आणि लोहार या दोन तालुक्यांच्या सीमा २ मे पर्यंत सील करण्यात आल्या आहेत.

From around the web