उस्मानाबाद जिल्ह्याच्या लॉकडाऊनबाबत नवीन आदेश जारी

 अत्यावश्यक सेवाच्या दुकानांना सूट
 
sd
धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे, चित्रपटगृह, नाट्यगृह बंदच राहणार

उस्मानाबाद :-  जिल्ह्यातील कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य आजाराचा प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. राज्य शासनाने “ब्रेक द चैन” (Break The Chain) अंतर्गत जारी केलेल्या सूचनांमध्ये काही प्रमाणात बदल करुन नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने ऑगस्ट 2021 पासून जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा आणि वस्तू संबंधी दुकाने तसेच व्यवसाय सोमवार ते शुक्रवार सकाळी 7:00 ते रात्री 8:00 वाजेपर्यंत चालू राहतील. शनिवार आणि रविवारी दुपारी 3:00 वाजेपर्यंत चालू राहतील, तर जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टीप्लेक्स (स्वतंत्र असलेले व शॉपींग मॉलमध्ये असलेले) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे जारी केले आहेत.

सार्वजनिक उद्याने, क्रीडांगणे, चालणे, जॉगिंग, सायकलिंग दररोज पूर्ण वेळ चालू राहील. शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांची कार्यालये पूर्ण क्षमतेने (100 टक्के क्षमतेने) त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरु राहतील. गर्दी टाळण्यासाठी कामाच्या तासांचे व शिफ्टचे सुयोग्य नियोजन करणे त्यांना आवश्यक राहील.

कृषी विषयक कामे, नागरी कामे, औद्योगिक उत्पादन, वस्तुंची मालवाहतूक पूर्ण क्षमतेने पूर्ण वेळ चालू राहील. जिम, योगा सेंटर्स, केशकर्तनालये/सलून, ब्युटी पार्लर्स, स्पा, वेलनेस सेंटर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:00 पर्यंत आणि शनिवार दुपारी 3:00 पर्यंत 50 टक्के आसनक्षमतेने चालू राहतील. वातानुकूलन यंत्र (ए.सी.) वापरास मनाई राहील.या आस्थापना रविवारी बंद राहतील.चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स, स्वतंत्र असलेले व शॉपींग मॉलमध्ये असलेले तसेच धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. शाळा, महाविद्यालये यांच्या बाबत राज्य शासनाच्या शिक्षण विभाग आणि उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे आदेश लागू होतील. ग्रामीण भागामध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग चालू करण्याबाबत शालेय शिक्षण तसेच क्रीडा विभागाचे परिपत्रक क्रमांक संकीर्ण : 2021/प्र.क्र.94/एसडी-6 दि.7 जुलै 2021 मधील मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात यावी.

खाजगी कोचिंग क्लासेस,शिकवणी वर्ग भरवताना शहरी, नागरी भागामध्ये इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त 20 विद्यार्थीसंख्येच्या मर्यादेत खाजगी कोचिंग क्लासेस, शिकवणी वर्ग चालू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. खाजगी कोचिंग क्लासेस, शिकवणी वर्ग यांनी उक्त नमूद शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे परिपत्रक क्रमांक संकीर्ण : 2021/प्र.क्र.94/एसडी-6 दि.7 जुलै 2021 चे परिशिष्ट अ व ब मधील सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील. तसेच जिल्ह्यातील कोविड-19 बाधित रुग्णसंख्येचा साप्ताहिक दर 10 टक्के च्या पुढे गेल्यास खाजगी कोचिंग क्लासेसना देण्यात आलेली परवानगी आपोआप रद्द झाल्याचे समजण्यात येईल.

रेस्टॉरंटस्,हॉटेल्स, उपहारगृहे, खानावळी सोमवार ते शुक्रवार सकाळी 07:00 ते सायंकाळी 04:00 पर्यंत 50 टक्के आसन क्षमतेच्या मर्यादेत ग्राहकांना आतमध्ये बसवून खाद्यपदार्थ खाण्यासाठी देण्यास परवानगी राहील. शनिवार आणि रविवार पार्सल सेवा, खाद्यपदार्थ घेऊन जाणे, घरपोच सेवा (Home Delivery)देण्यास परवानगी राहील.रात्री 09:00 वाजेपर्यंत जमावबंदी, रात्री 09:00 ते पहाटे 5:00 पर्यंत संचारबंदी लागू राहील.

वाढदिवस समारंभ, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणुका, निवडणुकीच्या रॅली, पदयात्रा, निषेध मोर्चे, आंदोलने इत्यादी ठिकाणी गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने या बाबींना घालण्यात आलेले निर्बंध यापुढेही लागू राहतील.चित्रिकरणासाठी केवळ Bubble चित्रिकरणास परवानगी असेल. सायंकाळी 05:00 नंतर बाहेरील हालचालीस पूर्णपणे प्रतिबंध राहील. मेळावे सामाजिक,सांस्कृतिक, मनोरंजनात्मक सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04:00 पर्यंत 50 टक्के लोकांच्या मर्यादेत परवानगी राहील. लग्नसमारंभास 50 लोकांच्या मर्यादेत परवानगी राहील.अंत्यविधी 20 लोकांच्या मर्यादेत परवानगी राहील. सभा,निवडणूका-स्थानिक संस्थांच्या, सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा 50 टक्के क्षमतेने परवानगी राहील.

बांधकामावर फक्त बांधकामाच्या ठिकाणी (साईट वर) राहणाऱ्या मजुरांना परवानगी अथवा बाहेरुन मजूर येणार असल्यास दुपारी 04:00 नंतर मजुरांनी काम बंद करुन बांधकामाच्या ठिकाणावरुन निघून जाणे बंधनकारक राहील. ई-कॉमर्स-वस्तु व सेवांना  कोविड विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन नियमित वेळेनुसार पूर्ण वेळ सुरु राहतील.

सार्वजनिक परिवहन बसेस 100 टक्के आसनक्षमतेने सुरु राहतील. उभे राहून प्रवास करण्यास मनाई राहील. खाजगी कार, टॅक्सी, बसेस, रेल्वे यांद्वारे आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक नियमित वेळेनुसार पूर्णवेळ सुरु राहील. तथापि, स्तर 5 (Leve 5) मध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमधून येणाऱ्या अथवा तेथे जाणाऱ्या प्रवाशांना ई-पास बंधनकारक राहील.

          याबरोबरच ज्या आस्थापनांना रात्री 08.00 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तेथे काम करणा-या व्यक्तींनी रात्री 09.00 पर्यंत घरी पोहोचणे आवश्यक राहील. रात्री 09.00 नंतर या आस्थापनांमध्ये काम करत असल्याच्या कारणावरुन किंवा या आस्थापनांच्या सेवा घेण्याच्या कारणावरुन कोणत्याही प्रकारची हालचाल करण्यास मनाई राहील.ज्या कार्यालयांचे काम घरुनच करता येणे (वर्क फ्रॉम होम) शक्य आहे त्या कार्यालयांचे काम घरुनच करणे चालू ठेवावे. कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन (मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन इ.) करणे बंधनकारक राहील. ज्या ज्या वेळेस खाजगी वाहनाद्वारे प्रवास करणा-या प्रवाशांजवळ ई-पास असणे आवश्यक राहील त्या त्या वेळेस वाहनातील सर्व प्रवाशांकडे वैयक्तिक पास असणे आवश्यक राहील. प्रवाशी वाहनांद्वारे प्रवास करणा-या प्रवाशांना स्वतंत्र पास असण्याची आवश्यकता असणार नाही.

अत्यावश्यक सेवांमध्ये (Essential Category) पुढील बाबींचा समावेश राहील :

दवाखाने, रोगनिदान केंद्रे, चिकित्सालये, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधालये, औषध कंपन्या, चष्मा दुकाने, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा आणि त्यांची उत्पादन तसेच वितरणासाठी सहाय्यक सर्व घटक जसे कार्यालये, वाहतूक, पुरवठा साखळी. लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क्स, वैद्यकीय साधनसामुग्री, त्यांची उपकरणे, कच्च्या मालाचे व सहाय्यक सुविधांचे घटक.पशुवैद्यकीय सेवा, प्राणी संगोपन केंद्रे व पशुखाद्यांची दुकाने.वन विभागाने जाहीर केलेली वन विषयक सर्व कामे.विमानचालन व संबंधित सेवा (विमान कंपन्या, विमानतळे, दुरुस्ती, माल, ग्राउंड सर्व्हिसेस, अन्नपुरवठा, इंधन, सुरक्षा इ.)

सर्व किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, दुध संकलन आणि वितरण केंद्र, सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने (बेकरी, मिठाई,चिकन, मटन, पोल्ट्री, मासे व अंडी यांसह) शितगृहे तसेच वखार सेवा. सार्वजनिक वाहतूक - विमाने, रेल्वे, टॅक्सी, ॲटोरिक्षा आणि सार्वजनिक बसेस. विविध देशांच्या राजदूतांच्या कार्यालयांशी संबंधित सेवा.स्थानिक विभागांची/प्राधिकरणांची सर्व मान्सूनपूर्व करण्यात येणारी कामे. स्थानिक विभागांच्या/प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व रिझर्व्ह बँकेकडून अत्यावश्यक म्हणून निदेर्शित करण्यात आलेल्या सेवा. सेबी (SEBI) ने मान्यता दिलेल्या बाजारांशी संबंधित सर्व कार्यालयांतील मुलभूत सुविधा संस्था जसे स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉझिटरीज, क्लिअरिंग कार्पोरेशन्स इ. आणि सेबी (SEBI) कडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ.  दूरसंचार सेवां (Telecom Services) च्या दुरुस्ती/देखभालीसाठी आवश्यक असणा-या बाबी/सेवा.मालवाहतूक,पाणीपुरवठा सेवा.

कृषिविषयक उपक्रम आणि कृषी विषयक कामे सुरळितपणे सुरु राहण्यासाठी आवश्यक असलेल्या संबंधित बाबी अंतर्गत कृषी अवजारे, बियाणे, खते, उपकरणे व त्यांची दुरुस्तीची दुकाने.आयात-निर्यातविषयक सर्व सुविधा. ई-वाणिज्य (E-Commerce) सेवा (फक्त अत्यावश्यक वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यास परवानगी राहील.) मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे. पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने (offshore / onshore production) यांसह Data Centers/Cloud Service Providers/ IT services supporting critical infrastructure and services. सर्व मालवाहतूक सेवा (Cargo Services), शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा (Security Services). विद्युत व गॅस सिलेंडर पुरवठा. ATM”S, पोस्ट / डाक विभागाच्या सेवा,बंदरे व संबंधित सेवा, लस (Vaccines)/जिवनावश्यक औषधे (lifesaving drugs)/औषधी उत्पादने (Pharmaceutical products) यांच्याशी संबंधित असणारे परवानाधारक वाहतूकदार (Licensed Multi Modal Transport Operators) आणि कस्टम हाऊस एजंट्स.

कोणत्याही अत्यावश्यक सेवांच्या उत्पादनासाठीचा कच्चा माल /आवेष्टन साहित्याचे (packaging material) उद्योग. पावसाळा ऋतुचे अनुषंगाने व्यक्ती आणि संस्थांकरिता आवश्यक असलेल्या वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग. या कार्यालयाच्‍या उपरोक्त वाचा क्र. 4 च्या आदेशांन्‍वये बंद असलेल्‍या ज्या बाबी आस्‍थापना, सार्वजनिक ठिकाणे, बाबी/उपक्रम, सेवा यांना या आदेशान्वये चालू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही त्या सर्व बाबी, आस्‍थापना, सार्वजनिक ठिकाणे, बाबी/उपक्रम, सेवा पूर्णवेळ बंद राहतील. यापूर्वी वेळोवेळी या कार्यालयाने निर्गमित केलेले आदेश वेळोवेळी करण्यात आलेल्या अद्यावत बदलांसह लागू राहतील. तसेच संदर्भ क्र. 4 मधील आदेशांत नमूद असलेल्या ज्या बाबींचा या आदेशात उल्लेख करण्यात आलेला नाही त्या बाबींसाठी संदर्भ क्र. 4 मधील आदेशांनुसार निर्देश लागू राहतील.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51  ते 60, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असेही या आदेशात म्हटले आहे.

From around the web