जिल्ह्यातील गुन्हेंगारी कमी करण्यावर भर देणार - नीवा जैन

तुळजापूरातील गुन्हेगारीवर विशेष लक्ष
 
x
गुन्हेगारी संदर्भात नागरिकांनी आमच्याशी थेट संपर्क साधावा

उस्मानाबाद -  जिल्ह्यात चोरी, गांजा तस्करी, गुटखा, मावा आदी अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले आहेत. त्यामुळे  जिल्ह्यातील जनतेला यापासून सुरक्षीत करण्यासाठी विशेष भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे तुळजापुरातील सर्वच प्रकारची गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी लक्ष केंद्रीत करणार असून कोणत्याही गुन्हेगारी संदर्भात नागरिकांनी थेट आमच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन नूतन पोलिस अधिक्षक नीवा जैन यांनी केले आहे. 


जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक नवनीतकुमार काँवत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना जैन म्हणाल्या की, जनता व पोलिसांमध्ये सुसंवाद वाढावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर आगामी काळात येणारा तुळजाभवानीचा नवरात्र उत्सव शांततेत पार पाडावा यासाठी जनतेने शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तुळजापूर येथे महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्या सर्व भाविकांनी कोरोनाचे दोन डोस घेणे आवश्यक आहे. कारण आपल्यामुळे इतर भाविकांना कोरोना विषाणूंचा धोका वाढू नये याची काळजी व पुरेपुर खबरदारी घ्यावी असे सांगून त्या म्हणाल्या की, या ठिकाणी  असणारे पोलिस अधिकारी, कर्मचारी देखील कोरोनाच्या दोन लसी घेऊनच बंदोबस्तावर तैनात होणार आहेत.

 तसेच जिल्हयातील १ हजार ७६८ पोलिसांपैकी १ हजार ६०० पोलिसांचे लसीकरण पुर्ण झाले असून हे प्रमाण ९५ टक्क्यापेक्षा जास्त आहे. तर उर्वरित कर्मचाऱ्यांमध्ये गरोदर महिला यांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले. तर जिल्ह्यात दोनचाकी वाहन, घरफोडी, मोबाईल चोरी, गळ्यातील सोन-साखळी चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. त्या बरोबरच गांजा तस्करी, गुटखा, मावा व अवैध दारू मोठ्या प्रमाणात शहरी भागासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे ती होऊच नये, यासाठी पोलिस प्रशासन विशेष लक्ष देऊन दक्ष राहणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी चोरट्यांच्या चोरी करण्याच्या पध्दतींचा बारकाईने अभ्यास करून चोरी करणारी टोळी सक्रीय आहे किंवा भुरटे चोर आहेत ? यावर कायमस्वरूपी अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तर जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे, कायमस्वरूपी रोखण्यासाठी आम्हाला असलेल्या सर्व संवैधानिक अधिकारांचा पुरेपूर वापर करून या गुन्हेंगारीचा बिमोड करणार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. 

यासाठीजिल्ह्यातील जनतेने देखील गुन्हेगारी विषयक तक्रारींबाबत जवळच्या पोलिसांना सतर्क राहून अवगत करणे आवश्यक आहे. जनतेने सहकार्य केले तरच आम्हाला वाढत्या गुन्हेगारीवर वेळीच देखरेख ठेवून त्यांची पाळेमुळे उखडता येणे सहज शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जनतेने न भिता संबंधित नजीकच्या पोलिसांबरोबरच अप्पर पोलिस अधिक्षक नवनीतकुमार काँवत यांच्या मो.नं.- ९५६०४०९४७९ या क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

From around the web