मुलगी पळून गेली म्हणून आई नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गेली ! ...
पोलिसांनी फिर्याद नोंद न करता आई- बहिणीवर शिवीगाळ केली !!
नळदुर्ग - तुळजापूर तालुक्यातील शिरगापूर येथील एका तरुणीला गावातीलच एका तरुणाने रात्रीच्या सुमारास पळवून नेले, त्याची तक्रार देण्यासाठी मुलीची आई नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गेली असता, दोन पोलिसांनी आई- बहिणीवर अश्लील शिवीगाळ करून पोलीस स्टेशनमधून हाकलून लावले. पोलीस आरोपीना अभय देत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिरगापूर येथील एक तरुणी ४ ऑक्टोबर रोजी रात्री बाराच्या सुमारास शौचालयकडे गेली असता, गावातील शरद राम गायकवाड याने तिला उचलून अज्ञात वाहनाने अज्ञात ठिकाणी पळवून नेले. दुसऱ्या दिवशी मुलीच्या आईने नळदुर्ग पोलीस स्टेशन गाठले असता, ठाणे अंमलदार मोरे आणि सातपुते यांनी,फिर्याद नोंद करून न घेता फिर्यादी महिलेस आई- बहिणीवर अश्लील शिवीगाळ केली, तसेच तूच मुलीला पळवून लावले आहेस, येथून निघून जा नाही तर तुझ्या ढुंगणावर काठ्या घालून ढुंगण लाल करीन अशी धमकी दिली तसेच फिर्यादीच्या नवऱ्या देखील अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केली.
या संदर्भात मुलीच्या आईने पोलीस अधीक्षक यांच्याकडे ७ ऑक्टोबर रोजी लेखी तक्रार केली असून, पोलीस अधीक्षक अश्लील शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणार की नेहमीसारखे पाठीशी घालणार ? याकडे लक्ष वेधले आहे.