सत्ताधारी आमदार, खासदार पत्रकापुरते ... 

वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावाची प्रगती शून्य - नितीन काळे
 
सत्ताधारी आमदार, खासदार पत्रकापुरते ...

उस्मानाबाद -   खोटी पत्रकबाजी करून उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न निकाली लागला असल्याचा कांगावा सत्ताधारी आमदार आणि खासदार करीत आहेत. केवळ पत्रकबाजीपुरते मर्यादीत असलेल्या आमदार, खासदारांनी मागील वर्षभरात उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव कुठे रखडला? याची वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. राज्य सरकारच्या संथ कारभारामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव जैसे थे आहे आणि घोषणांचा कांगावा करणारे आमदार, खासदार जिल्हावासीयांची दिशाभूल करीत आहेत. मागील वर्षभरात याबाबत शून्य प्रगती झाली आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी वस्तुस्थिती दडवून खोटारडेपणा करीत असल्याचा खळबळजनक दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केला आहे. 

राज्याचे पर्यावरणमंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत 26 ऑगस्ट रोजी बैठक झाली. या बैठकीत उस्मानाबादचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेऊन केंद्राकडे मान्यतेसाठी पाठविण्याचा निर्णय झाला असल्याचे स्थानिक सत्ताधारी आमदार आणि खासदारांनी जाहीर केले होते. केवळ पत्रकबाजी करणार्‍या खासदार आणि आमदार महोदयांनी मागील वर्षभरात याप्रकरणात नेमकी काय प्रगती झाली? याचाही खुलासा करावा, असे आव्हान काळे यांनी दिले आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे, याससाठी मागील दहा वर्षांपासून सातत्याने आग्रही मागणी केली जात आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याबाबतचा ठराव मांडून 2011 साली पालकमंत्री यांच्या मान्यतेने शासनाकडे पाठविला होता. विद्यमान सरकारकडे देखील सातत्याने त्यांचा पाठपुरावा सुरूच आहे. मात्र हे महाविकास आघाडी सरकार याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही काळे यांनी केला आहे.

 मागील वर्षी 29 ऑगस्ट 2019 च्या केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने देशातील 75 जिल्ह्यांत नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना विशेष अर्थसहाय्य देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. ही सर्व महाविद्यालये 2021-22 या शैक्षणिक वर्षात सुरू करण्याचा संकल्प आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याकरिता लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञांची त्रिसदस्यीस समिती गठीत करण्यात आली होती. प्राथमिक तपासणीनंतर निदर्शनास आलेल्या ठळक बाबी या समितीने वर्षभरापूर्वीच राज्य सरकारकडे सादर केल्या आहेत. त्याचे पुढे काय झाले? याचे उत्तरही खासदार आणि आमदार महोदयांनी द्यावे, असेही नितीन काळे यांनी म्हटले आहे.
 
आदित्य ठाकरे आणि अमित देशमुख यांच्या बैठकीनंतर स्थानिक सत्ताधारी खासदार आणि आमदारांनी काढलेल्या पत्रकाला आता 73 दिवस झाले आहेत. त्यानंतर देखील वर्षभरापूर्वी जी परिस्थिती होती, आजही तशीच कायम आहे. केवळ मंत्रिमंडळाच्या मान्यतेने प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यासाठी ही सत्ताधारी मंडळी एवढा विलंब का करीत आहे? स्थानिक सत्ताधारी लोकप्रतिनिधी त्याबाबत नेमका कोणत्या प्रकारचा पाठपुरावा करीत आहेत? याचे उत्तर जिल्हावासीयांना मिळायला हवे. केवळ पत्रकबाजीतून खोटारडेपणा न करता पाठपुरावा करून मंत्रिमंडळाच्या मंजुरीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करा. केंद्रातील सरकार उस्मानाबादवासीयांच्या अडचणी सोडविण्याकरिता तत्पर आहे. किमान स्वतःचे काम तरी नीट करा, असा टोलाही नितीन काळे यांनी खासदार ओम राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना लगावला आहे.

From around the web