कळंबमध्ये दरोडेखोरांची व्यापाऱ्यास बेदम मारहाण 

धनंजय मुंडे यांच्या पीएने फोन केल्यानंतर गुन्हा दाखल 
 
कळंबमध्ये दरोडेखोरांची व्यापाऱ्यास बेदम मारहाण
कळंब शहरात दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी एका व्यापाऱ्यास बेदम मारहाण करून सोन्याची चैन पळविली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यास मुजोर पोलिसांनी नकार दिला. 

कळंब ( विशाल कुंभार ) -जबरी दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी शहरातील एका  व्यापाऱ्यास बेदम मारहाण करून गळ्यातील सोन्याची साखळी पळवून नेली.त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ सुरु केली. व्यापाऱ्याच्या पत्नीने मंत्री धनंजय मुंडे यांना  फोन करून घडलेली घटना सांगितल्यानंतर दस्तुरखुद्द पोलीस अधीक्षक कळंबमध्ये दाखल झाले आणि दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलीस निरीक्षकावर कारवाई  करण्याची मागणी होत आहे. 

 शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अजय हरकचंद कर्नावट यांचे शेती अवजारांचे दुकान आहे. दुकानाच्या फर्निचरचे काम चालू असल्याने दि 16 नोव्हेंबर रोजी कर्नावट हे चॅनेल गेट लाऊन दुकानासमोर झोपले. मध्यरात्री एक  ते सव्वा वाजण्याच्या सुमारास झोपेत असतानाच कोणीतरी कपाळावर जोरात मारल्याने त्यांना जाग आली. त्यांनी डोळे उघडून पाहिले असता समोर सात ते आठ जण दिसले. त्या दरोडेखोरांनी कर्नावट यांना लोखंडी रॉडने पुन्हा मारहाण केली.

 दरोडेखोरांनी अजय हरकचंद कर्नावट यांच्या  गळ्यातील 10 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावून घेतली व पुन्हा बीअरच्या बाटलीने, लाथा बुक्क्याने मारहाण केली. यावेळी कर्नावट यांनी आरडाओरड केल्याने वरच्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या मुलाने ओरडून खाली धाव घेतली. त्याचवेळी पोलिसांची पेट्रोलिंगची गाडी आली. त्यामुळे दरोडेखोरांनी तीन मोटारसायकल वरून पळ काढल्याचे कर्नावट यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

    मारहाण करणारे 22 ते 35 वयोगटातील होते तसेच मराठी बोलत होते. पाडवा सण असल्यामुळे घरी सोने आणून ठेवले होते,त्याउद्देशाने दरोडेखोर आले असावेत असेही कर्नावट यांनी तक्रारीत म्हटले आहे. कर्नावट यांना पोलीस पेट्रोलिंग वाहनात उपचारासाठी कळंब उपजिल्हा रुग्णालयात व पुढील उपचारासाठी अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या मारहाणीत हात मोडला असून इतर ठिकाणी जबर मार लागला आहे. या फिर्यादीवरून आठ अज्ञात दरोडेखोरांवर भा दं वि कलम 395 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

कळंब पोलीस ठाण्यात अजय कर्नावट हे उपचार घेऊन आल्यानंतर फिर्याद देण्यासाठी गेले असता तेथील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी तक्रार द्या असे सांगितले मात्र एफ आय आर दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. कर्नावट यांच्या पत्नी किरण कर्नावट यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक तसेच सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक पाटील यांना आपबिती सांगितली. त्यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांनाही घटना व त्याचे गांभीर्य सांगितले. त्यानंतर चक्रे फिरली व मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केल्याचे कर्नावट यांनी सांगितले. किरण कर्नावट यांच्यावर एका आजाराबाबत उपचार चालू आहेत. तरीही पोलिसांनी फिर्याद दाखल करून न घेता आम्हा पती पत्नींना ताटकळत ठेवल्याबद्दल पोलिसांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान एस पी रोशन यांनी आज घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.या प्रकाराबद्दल माहिती घेण्यासाठी पो नि तानाजी दराडे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे  संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.


कळंब शहरात अवैध धंदे तसेच चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मागील आठवड्यात कथले चौक भागात तीन चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला तसेच इतर लहान मोठ्या चोऱयांमध्ये वाढ झाली आहे. यासाठी पोलीस ठाण्यात सक्षम पोलीस अधिकारी नियुक्त करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरीत आहे.

From around the web