आगामी वर्षी उस्मानाबादचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार 

राज्यातील वैद्यकीय परीक्षा ठरलेल्या वेळेतच 
 
d
- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची उस्मानाबादेत माहिती 

 उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्याची अनेक वर्षाची मागणी असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आगामी वर्षांपासून सुरू करण्यात येईल. इथल्या व्यवस्था परिपूर्ण करा. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेतच 10 हेक्टर 81 आर. मध्ये हे महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. या महाविद्यालयासाठी लागणाऱ्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे. या ठिकाणाहून चांगले तंत्रज्ञ, नर्स, डॉक्टर तयार व्हावेत, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.राज्यातील वैद्यकीय परीक्षा ठरलेल्या वेळेतच होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले


उस्मानाबाद येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात परिचारिका प्रशिक्षण केंद्रात कोरोना आढावा बैठकीत श्री. देशमुख बोलत होते. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, अधिष्ठाता डॉ. मालू, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी हणमंत वडगावे आदिंसह विभागप्रमुख उपस्थित होते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे. यामुळे १८ वर्षाखालील बालकांना कोरोनाची लागण झाली तर लक्षण दिसत नाहीत. यामुळे त्यांची काळजी घ्या, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराची सोय निर्माण करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी प्रशासनाला दिले.

कोमॉर्बिड बालकांची काळजी घ्या

श्री. देशमुख यांनी सांगितले की, कोरोनाची दुसरी लाट आता ओसरु लागली आहे. तिसरी लाट येणार हे ग्रहीत धरुन नियोजन करा. लहान मुलांना आतापासूनच विलगीरणात ठेवायला हरकत नाही. ज्या मुलांना हृदय विकार, शुगर, दमा आहे, त्यांची काळजी योग्य काळजी घ्या. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी बालरोगतज्ज्ञ आणि बालरोग अतिदक्षता विभाग यांच्याशी योग्य समन्वय साधून नियोजन करा. लहान मुलांसाठी व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा. वार्ड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर यांचे नियोजन करा. ग्रामीण भागातील शासकीय दवाखान्यात व्हेंटिलेटर, बायपैप मशीन, ऑक्सिजन बेड याची तयारी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

येणारे 100 दिवस महत्वाचे आहेत, जिल्ह्यात संसर्ग कमी होत असल्याचे दिसत असले तरी चाचण्यांची संख्या कमी करू नका. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या. आरटीपीसीआर चाचण्यासाठी प्रयोगशाळा संख्या वाढवा. त्वरित चाचण्या करता याव्यात, अशी व्यवस्था निर्माण करा. ग्रामीण रुग्णालयात किमान एक व्हेंटिलेटर आणि पाच मिनी व्हेंटिलेटरची सोय करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

कोरोना रुग्णांना आधार द्या

कोरोनाचा रुग्ण घाबरलेला असतो, त्यांना मानसिक आधार द्या. लस उपलब्धतेनुसार लसीकरण करून घ्या. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आणि हात साबणाने धुतल्याशिवाय पर्याय नाही, हे नागरिकांना पटवून द्या, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले. 

अनाथ मुलांचा सर्व्हे करा

कोरोनामुळे आई वडील मृत झालेल्या बालकांची माहिती जमा करा. जिल्ह्यातील अशा बालकांची यादी तयार करण्यासाठी सर्व्हे करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी जिल्ह्याची स्थिती, वैद्यकीय महाविद्यालय याबाबत माहिती दिली. यावेळी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्याने मंत्री श्री. देशमुख यांचा सन्मान करण्यात आला.

From around the web