गुड न्यूज : उस्मानाबादच्या शासकीय मेडिकल कॉलेजसाठी पदभरती सुरु 

 
s

उस्मानाबाद - उस्मानाबादला मेडिकल कॉलेज मंजूर झाल्यानंतर आता  पदनिर्मिती आणि भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या शासकीय मेडिकल कॉलेज साठी  चार टप्यात एकूण 448 पदे भरली जाणार आहेत. 

पहिल्या वर्षी 199, दुसऱ्या वर्षी 138,तिसऱ्या वर्षी 76, चौथ्या वर्षी 35 पदे भरली जाणार आहेत.  यासाठी 97.60 कोटी रुपयांच्या खर्चास शासनाची मान्यता मिळाली असून,  गट-अ ते गट-ड पदे, 4 टप्यात भरली जाणार आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 430 खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळाने यापूर्वीच दिली आहे. 

उस्मानाबादला 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास संलग्न 430 खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय १३ जानेवारी रोजी  झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी एकूण रुपये 674.14 कोटी (अनावर्ती खर्च सुमारे रुपये 429.63 कोटी व आवर्ती खर्च सुमारे रूपये 244.51 कोटी) इतका निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच आवश्यक तेवढी पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास देखील मान्यता देण्यात आली होती. 

नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय आणि क्षय रुग्णालय स्थावर जंगम मालमत्तेसह तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास निशुल्क वापरास उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली होती. 

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत उस्मानाबादला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करताना पीपीपी ( पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ) ची अट घालण्यात आली होती, त्यानंतर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास  पाटील यांनी पीपीपीला जोरदार विरोध केल्यानंतर राज्य शासनाने नवा जीआर काढून पीपीपीची अट रद्द केली आहे.

From around the web