खेड पाटीजवळ भीषण अपघात : आईसह 2 मुली जागेवरच ठार

 

पुण्यातील कोरोनाच्या भीतीने दोन कुटुंब गावाकडे निघाले
गाव तीन किलोमीटर असताना काळाने घातला घाला 

खेड पाटीजवळ भीषण अपघात  : आईसह 2 मुली जागेवरच ठार

उस्मानाबाद - पुण्यात कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढत आहे म्हणून बचावासाठी आपल्या गावाकडे जात असताना माकणीच्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. लोहारा तालुक्यातील खेड पाटीजवळ एका भीषण अपघातात चार  ठार तर पाच गंभीर जखमी झाले आहेत. त्यात आईसह 2 मुली जागेवरच ठार झाल्या आहेत. गाव अवघे तीन किलोमीटर अंतरावरच असतानाच काळाने हा घाला घातला. या घटनेमुळे गावातील नागरिकांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 लोहारा तालुक्यातील माकणी येथील नारायण साठे व सतिश पवार हे कामानिमित्त पुण्यातच वास्तव्यास होते. पुणे शहरात कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यामुळे साठे आणि पवार  कुटुंब एकाच कारने पुण्याहून शुक्रवारी गावी माकणीकडे जात असताना खेड पाटीजवळ माकणीहून येणाऱ्या कंटेनरची (एम.एच.13 आर 1257) व कारची (एम.एच. 12 पीएच 6326) जोरदार धडक बसली. यात चालक नेताजी मनोहर मोरे यांच्यासह मनिषा नारायण साठे, वैष्णवी नारायण साठे, वैभवी नारायण साठे हे चार जण जागेवरच ठार झाले. तर नारायण हरीदास साठे व त्यांचा मुलगा हरीश नारायण साठे हे गंभीर जखमी झाले आहेत. यांना पुढील उपचारासाठी सोलापुरला हालवण्यात आलं आहे. तर शितल सतिश पवार, संस्कृती सतिश पवार, वेदांत सतिश पवार हे ही गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी उस्मानाबादला हालवण्यात आलं आहे. या अपघातात मायलेकरांसह चौघांचा मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त केली जात असून माकणी गावावर शोककळा पसरली आहे.

  • लोहारा तालुक्यातील खेड पाटीजवळ कंटेनर - कार  धडक
  • शुक्रवारी दुपारी तीन वाजता घडला अपघात 


From around the web