तुळजापुरात गुन्हा दाखल होताच देवानंद रोचकरी फरार 

मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरण 
 
s

तुळजापूर  : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी  मातेच्या तुळजापूर  येथील प्राचीन मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी अखेर देवानंद साहेबराव रोचकरी आणि त्यांचा बंधू बाळासाहेब साहेबराव रोचकरी यांच्यासह इतर आरोपीं विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गुन्हा दाखल होताच देवानंद रोचकरी फरार झाल्याचे समजते. 


तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण,तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे.गरीबनाथ दशअवतार मठाचे महंत सावजी महाराज, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष तथा मनसेचे जिल्हा संघटक अमर राजे कदम, राष्ट्रवादी पक्षाच्या कायदे विभागाचे तुळजापूर कार्याध्यक्ष ऍड जनक धनंजयराव कदम पाटील व इतरांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांना 31 मे 21 रोजी लेखी तक्रार करून तुळजापूर शहरातील प्राचीन श्री विष्णू तीर्थ (सध्या मंकावती कुंड नावाने प्रचलित) बेकायदेशीर काम करणाऱ्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे,नगर परिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे व भूमी अभिलेख कार्यालयाच्या उप अधीक्षक वैशाली गवई यांच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीची नेमणूक केली होती या समितीने केलेल्या अहवालांनंतर जिल्हाधिकारी यांनी फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते. 

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 4 वेगवेगळ्या मुद्यावर कारवाईचे आदेश जारी केले होते. जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक यांनी मूळ आखीव पत्रिकेवर महाराष्ट्र शासन यांचे नगर परिषद निगराणीखाली नोंद नियमित करावी. सदर कुंड प्राचीन असल्याने प्राचीन स्वरूपातील बांधकामात काही बदल झाले असतील तर औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक यांनी पुरातत्व संवर्धन कायदा 1904 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करावी. बनावट कागदपत्रे प्रकरणी नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी व तुळजापूर तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सदर जागी अतिक्रमण होणार नाही यांची दक्षता घ्यावी असे चार मुद्दे आदेशित केले होते.


जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चौकशी समितीच्या अहवालानंतर मंकावती तीर्थ कुंड प्रकरणी फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याला रोचकरी यांनी स्थगिती आणली होती. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी प्रकरणाची सत्य स्तिथी व प्रशासनाची बाजू ऐकल्यावर ही स्थगिती तात्काळ उठवली. मंत्र्यांनी स्थगिती उठविले आणि पुढील कार्यवाहीबाबतचे आदेश नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी उ ना सार्दळ यांनी काढले. 2 ऑगस्ट रोजी देवानंद रोचकरी यांनी केलेल्या अपील आणि स्थगिती आदेशावर 9 ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने सुनावणी घेण्यात आली. यात वस्तुस्थिती विचारात घेऊन जिल्हाधिकारी यांचे आदेश कायम ठेवण्यात आले त्यानंतर देवानंद रोचकरीसह इतरांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

काय आहे तीर्थकुंड प्रकरण ?

तुळजापूरची तुळजा भवानी हे अवघ्या महाराष्ट्राचे अराध्य दैवत आहे. देवीच्या दर्शनासाठी प्रत्येक भाविक वर्षातून एकदा का होईना इथे दर्शनासाठी येतोच. या धार्मिक व ऐतिहासिक स्थळामधील प्रत्येक जागा भाविकभक्तांसाठी पावित्र्याचे व मांगल्याचे प्रतीक आहे.

याच तुळजाभवानी माता मंदिर परिसरात एक पुरातन तीर्थकुंड असून, मंकावती तीर्थकुंड या नावाने ते प्रसिद्ध आहे. मात्र, हे तीर्थकुंड वारसाहक्काने आपल्याकडे आले असून हे तीर्थकुंड आपल्या खाजगी मालमत्तेचा भाग असल्याचा दावा करून भाजप नेते देवानंद रोचकरी यांनी हडपले आहे.

धार्मिक ग्रंथात आणि पुराणात उल्लेख असलेले हे तीर्थकुंड खासगी कसे काय होऊ शकते, असा भाविकांचा सवाल आहे. तुळजाभवानी मंदिरासमोरील परिसरात तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराचे हे मंकावती कुंड आहे. या कुंडाची महती स्कंद पुराणात आहे. तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणातही या कुंडाचा उल्लेख सापडतो. या कुंडावर पूर्वी भाविक स्नानासाठी जात. परंतु नंतरच्या काळात हे कुंड खासगी असल्याचा दावा भाजप नेते देवानंद रोचकरी यांनी केला आहे. त्यामुळे तेथे कोणी स्नानासाठी जात नाही. त्या परिसरात रोचकरी यांनी खासगी बांधकामही केलंय.

याबाबत स्थानिक व भाविकांनी आवाज उठविल्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या प्रकरणात लक्ष घालून, हे कुंड हडपणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता. आता याच आदेशाला कायम ठेवून नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांना एकप्रकारे दिलासाच दिला आहे.

रोचकरी यांच्यावर मंकावती तिर्थकुंड स्वतःच्या नावावर करून हडप करण्यासाठी बोगस कागदपत्रे व पुरावे तयार करणे, फसवणूक करणे यासह कलम 420, 468, 469, 471 आणि 34 सह गुन्हा नोंद असून तपास पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद करीत आहेत. तिर्थकुंड हडप प्रकरणात रोचकरी बंधूची प्रथम खबरमध्ये नावे असून त्यांना या प्रकरणात कोण कोण मदत केली ? या कटात तुळजापूर भूमी अभिलेख कार्यालयासह नगर परिषद व इतर कार्यालयातील कोणते घोटाळेबाज अधिकारी अडकले आहेत? हे पोलीस तपासात समोर येणार असून राज्यभर गाजलेल्या या प्रकरणाचा तपास करणे व मूळ आरोपीसह कटात सहभागी अधिकारी यांना शोधणे हे एक मोठे आव्हान असणार आहे.

.

From around the web