उस्मानाबाद : तारीख - २, कोरोना रुग्ण - २ !
Apr 3, 2020, 09:01 IST
जगभर हाहाकार उडवणाऱ्या कोरोना विषाणूचा शिरकाव उस्मानाबाद जिल्ह्यात होणार नाही, असे वाटत असतानाच २ एप्रिल तारीख खळबळ उडवून देणारी ठरली. एकाच दिवशी दोन कोरोना बाधित रुग्ण जिल्ह्यात आढळल्याने २ एप्रिल रोजीची रात्र झोप उडवणारी ठरली.
देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा आकडा २५४३ गेला आहे तर ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात हा आकडा ४२३ गेला आहे. ३१ मार्च पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित एकही रुग्ण नव्हता आणि २ एप्रिल रोजी एकदम दोन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
पहिला रुग्ण उमरगा तालुक्यातील बलसूर येथील रहिवासी असून, त्याचे वय ३१ वर्षे आहे. तो पानिपत, दिल्ली येथून फिरून आला आहे. दुसरा रुग्ण लोहारा तालुक्यातील धानोरी येथील रहिवासी असून तो मुंबईहुन आला आहे. तो मुंबईच्या ताज हॉटेल मध्ये वेटर म्हणून कामास होता अशी माहिती आहे.
लोहारा तालुक्यातील धानुरी गावचे जवळपास अनेक तरूण मुंबईत ताज हाॅटेलमध्ये कामाला आहेत. त्यातील २० ते २५ जण या संशियताप्रमाणेच पळून आल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. अत्यावश्यक सेवेचा या संशयित रुग्णाने फायदा घेतला असुन ताज हाॅटेल वरुन त्याने वाशी मार्केटला येऊन तेथील संत्राच्या गाडीतुन थेट जळकोट व पुढे टमटम मधुन तो त्याच्या धानुरी गावाला पोहचल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसापासून तो गावातच असल्या कारणानं गावात तो किती लोकांच्या संपर्कात आला आहे, याची माहिती प्रशानाकडून घेण्यात येत आहे. पण यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोनवर गेल्याने भितीचे वातावरणच निर्माण झाले आहे.
पहिल्या रुग्णावर उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर दुसऱ्या रुग्णावर तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार होणार आहेत. त्याचा रिपोर्ट जेव्हा आला, तेव्हा तो गावातच होता, त्याचा रिपोर्ट येण्याअगोदर त्यास गावी जाण्यास परवानगी कशी काय देण्यात आली ? असा प्रश्न विचारला जात आहे. यानिमित्ताने आरोग्य यंत्रणा किती झोपेत आहे, हे समोर आले आहे.
या दोन्ही कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात किती रुग्ण आले, याची माहिती प्रशासन घेत आहे. धानोरीच्या रुग्णाच्या संर्पकात किमान ३० जण आले असून, त्यांना गावातील शाळेत क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील १३६ नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहेत. यातील १३ जण हे रुग्णालयामध्ये दाखल आहेत. जिल्ह्यामध्ये परजिल्ह्यातून; तसेच परदेशातून येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने धोका वाढला होता. आता पहिला रुग्ण आढळला असून, यापुढे ही साखळी थांबविण्याचे मोठे आव्हान आता प्रशासन तसेच आरोग्य विभागासमोर असणार आहे.
बाहेरून आलेल्या नागरिकांचा बुधवारपर्यंतचा आकडा सुमारे ५५ हजारांच्या जवळपास गेला होता. त्यावरून कोरोना विषाणूचा धोका जिल्ह्यामध्ये बळावणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्चच्या मध्यरात्री पासून लॉकडाऊन सुरु आहे. १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. आताच २ रुग्ण सापडले आहेत, ही संख्या नियंत्रित राहण्याची गरज आहे. लोकांनी शासन आणि प्रशासन ज्या सूचना सांगते ते पाळण्याची गरज आहे, अन्यथा केवळ उन्हाच्या भरवश्यावर राहणाऱ्या उस्मानाबादकरांच्या नशिबी निराशा पडायला नको.
उस्मानाबाद लाइव्ह डेक्स