उस्मानाबादेत कोरोना संशयित रुग्ण अखेर दाखल...

 

उस्मानाबाद लाइव्हच्या दणक्यानंतर कोरोना वार्ड उघडला .. 


उस्मानाबाद - उस्मानाबाद लाइव्हने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बेफिकीर कारभाराची लक्तरे वेशीवर टांगल्यानंतर कोरोनाचा वार्ड उघडण्यात आला आणि त्या संशयित रुग्णास त्या वार्डमध्ये ऍडमिट करून घेण्यात आले. परंतु या वार्डची पाहणी केली तर सर्व दारे- खिडक्या सताड उघडे असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

उस्मानाबादेत कोरोना संशयित रुग्ण अखेर दाखल...

कोरोना व्हायरसचा संसर्ग  होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने अनेक पोकळ दावे केले होते. एकीकडे शाळा, महाविद्यालय, मंदिरे, आठवडी बाजार बंद करण्यात आले पण दुसरीकडे आरोग्य यंत्रणा झोपलेली दिसून आली.

उस्मानाबाद तालुक्यातील सम्रुद्रवाणी येथील ५५ वर्षाचा एक व्यक्ती पुण्यातील पिंपरी - चिंचवडमध्ये काही दिवसापूर्वी आपल्या नातेवाईकाकडे गेला होता , परत आल्यानंतर तो स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेला असता, स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास अँब्युलन्सने जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे कोरोना संशयित रुग्ण म्हणून पाठवले पण तो येथे आल्यानंतर कोरोना वार्डच बंद होता. तो एक तास त्या कोरोना वार्डसमोर उभा होता, पण कुणीही कर्मचारी फिरकला नाही.

उस्मानाबाद लाइव्हने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या या बेफिकीर कारभाराची लक्तरे वेशीवर टांगल्यानंतर अधिकाऱ्यांची धावाधाव सुरु झाली आणि त्या संशयित रुग्णास त्या वार्डमध्ये ऍडमिट करून घेण्यात आले.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जुन्या बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर( जुना डिलिव्हरी वार्ड )  कोरोना  वार्ड तयार करण्यात आला आहे. परंतु त्या कोरोना वार्डची सर्व दारे खिडक्या सताड उघडे दिसली.


आरोग्य यंत्रणा झोपेत 

एकीकडे कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शासन सर्व तऱ्हेचे प्रयत्न करीत आहे, मात्र दुसरीकडे  उस्मानाबादची आरोग्य यंत्रणा झोपेत दिसली. कोरोना वार्ड बंद दिसला. त्याचबरोबर कोणतीही यंत्रणा सजग दिसली नाही.

विशेष म्हणजे आजच पालकमंत्री शंकरराव गडाख उस्मानाबादेत दाखल झाले असून कोरोनाबाबत आढावा बैठक घेत आहेत, त्याचवेळी जिल्हा आरोग्य  यंत्रणेचा बेफिकीर कारभार समोर आला आहे.

 संबंधित बातमी

From around the web