उमरगा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट : ३९ जण हायरिस्कच्या यादीत

 

 उमरगा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट : ३९ जण हायरिस्कच्या यादीत


उमरगा - उस्मानाबाद जिल्ह्यात ९ एप्रिल पर्यंत कोरोनाचे तीन पॉजिटीव्ह रुग्ण आढळले आहेत, पैकी दोन उमरगा तालुक्यातील तर एक लोहारा तालुक्यातील आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे.

उमरगा शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक व संपर्कातील १९ जणांचा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्यातील १७ जण व बलसूर येथील रुग्णाच्या कुटुंब, संपर्कातील २२ जण असे ३९ जण हायरिस्कच्या यादीत असून आरोग्य विभागाचे त्यांच्यावर विशेष लक्ष आहे.

ग्रामीण भागातील बलसूरसह अन्य गावातील जवळपास तीसहून अधिक नागरिकांचे स्वॅब तपासण्यात आले होते. त्यांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, पाच ते सहा दिवसांनंतरची स्थिती पाहता २२ जणांचा समावेश हॉयरिस्क यादीत करण्यात आला असून, त्यातील १७ जणांचे स्वॅब बुधवारी  पुन्हा तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

उपजिल्हा रुग्णालयातून ८ एप्रिलपर्यंत ११३ जणांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोघे पॉझिटिव्ह आले होते. शहरातील तरुणाच्या संपर्कातील १९ जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तरीही आरोग्य विभाग कोणत्याही प्रकारचा धोका पत्कारायला तयार नाही. त्यातील १७ जणांची नावे हायरिस्कच्या यादीत घेण्यात आले असून त्यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष राहणार आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या त्या गावातील स्थिती तूर्त समाधानकारक असली तरी ऐनवेळी परिस्थिती बदलू शकते.

आरोग्य विभागाने आठ पथकाच्या माध्यमातून विशेष लक्ष ठेवून २२ जणांना हॉयरिस्क यादीत समावेश केले असून, बुधवारी त्यातील १७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तसेच खबरदारी म्हणून मंगळवारी बलसूर येथील एक आरोग्य कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयातील एक डॉक्टर अाणि रुग्णवाहिकेच्या चालकाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असून इतर सहा जणांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

From around the web