कोरोना : तुळजाभवानी देवीचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय

 
उद्या सकाळी 5 वाजल्यापासून मंदिर बंद राहणार  

कोरोना : तुळजाभवानी देवीचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय
तुळजापूर: करोना विषाणू संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचे दर्शन उद्या मंगळवार दिनांक 17 मार्चपासून पुढील आदेश  येईपर्यंत बंद करण्यात आले असल्याची माहिती  तहसीलदार योगिता कोल्हे यांनी दिली. धार्मिक कार्यक्रम तसेच  इतर पूजा विधि नियमित पार पडणार असून फक्त दर्शन बंद करण्यात आले आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर  चैत्र पौर्णिमेची यात्राही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या पाच एप्रिल पासून चैत्र यात्रा सुरू होणार होती. या यात्रेला इतर राज्यातूनही लाखो भक्त येत असतात, त्यामुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असं तहसीलदार योगिता कोल्हे म्हणाल्या. तुळजाभवानी देवस्थान हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत म्हणून हे देवस्थान प्रसिद्ध आहे.


 सध्या राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने मंदिर प्रशासनाने तुळजापूर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून संसर्ग रोखण्यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.यामुळे कुठल्याही व्हीआयपी व्यक्ती किंवा सामान्य नागरिकाला मंदिर दर्शनाचा लाभ घेता येणार नाही.

देवीची पूजा ही मंदिराचे महंत व पाळीकर पुजारी करतील. मंदिरामध्ये ४ पेक्षा जास्त पुजारी उपस्थित राहू शकणार नाहीत. देवीचे दैनंदिन धार्मिक विधी भाविकांविना पार पडणार असून याचा मंदिर प्रशासनाला मोठा फटका देखील सहन करावा लागणार आहे.

तुळजापूर मंदिरामध्ये रोज देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. यामध्ये पुणे जिल्ह्यातील भाविकांची   संख्या जास्त असते. सध्या पुण्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जर काही संशयित रुग्ण दर्शनाला आल्यास इतर भाविकांना याची लागण होऊ शकते. त्याच प्रमाणे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून देखील मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या सगळ्या गोष्टी  लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने तुळजा भवानीचं मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, याशिवाय चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे.

इतिहासात पहिल्यांदाच तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या बैठकीत घेण्यात आला आहे.


From around the web