कोरोना ; पुण्यातील मुलाची उस्मानाबादच्या मातेला चिंता !

 
कोरोना ; पुण्यातील मुलाची उस्मानाबादच्या मातेला  चिंता !
पुणे / उस्मानाबाद - जगात हाहाकार माजवलेल्या कोरोनाचे पुण्यात जवळपास १० रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे पुण्यातील शाळा - महाविद्यालये, मॉल्स, चित्रपटगुहे आदी गर्दीचे ठिकाणे काही काळासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्यात राहणाऱ्या उस्मानाबादकरांची धास्ती वाढली असून, त्यांचे उस्मानाबाद जिल्ह्यातील नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहे. त्यामुळेच पुण्यातील उस्मानाबादकर एकमेकांना निरोप देत आहेत, चला गावाकडे !

महाराष्ट्रात सर्वात मागास जिल्हा म्हणून उस्मानाबादची ओळख आहे.कायम दुष्काळी जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यातील हजारो बेरोजगार तरुण पुण्यात नोकरीसाठी राहत आहेत.१९७२ च्या दुष्काळात अनेक लोक पुणे शहर आणि  पिंपरी - चिंचवड मध्ये आले आणि येथेच स्थायिक झाले.   तसेच शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनी पुण्यात राहात आहेत. जवळपास  ३०  हजार लोक पुणे शहर आणि  पिंपरी - चिंचवड मध्ये राहत आहेत.

महिनाभरापासून चीनमध्ये कोरोना रोगामुळे हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. आता हा ‘कोरोना’ देशाबरोबर महाराष्ट्रातही दाखल झाल्याने व त्याबद्दलची भीती वारंवार सांगितली  जात असल्याने गावाकडे राहणाऱ्या मातेला पुण्यात  राहणाऱ्या मुलांची चिंता सतावत आहे.

पुण्यात शिक्षणासाठी तसेच रोजगारासाठी वास्तव्याला असणाऱ्या युवकांना ग्रामीण भागातून आपल्या गावातून आई-वडिलांचे फोन जाऊ लागले आहेत. कुणाला काळजी घ्या तर कुणाला तू, तुम्ही हा रोग जाईपर्यंत गावाकडेच या, अशी विनवणी केली जात आहे.

मुलगा आणि आईच्या संवादाची क्लिप व्हायरल

मी टीव्हीला बघितलंय, कोरोनाच्या माणसांना मारून टाकत्याती. त्याज्यामुळं तू लवकर घरी ये, हे सगळं गेलं की मग वाटलं तर परत पुण्याला जा, मी तुला घरी बसून सांभाळते, पण तू घरी ये रे माझ्या बाबा, तू आता लगेच ये, मी तू आल्याशिवाय जेवणारही नाही, अशी विनवणी करणाऱ्या मातेचा फोनवरील संवाद सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


काय म्हणते ती ‘आई’?

मुलगा : हेलो मम्मी!
आई : हा! तू आताच्या आता गावाकडे परत ये आणि हे सर्व संपलं की मग जा परत माघारी
मुलगा : ठीक आहे…, तू ते टीव्हीमध्ये बघितलं व्हयं?
आई : हो! टीव्हीला देतयं की, टीव्हीला सांगतयं की…, माणसं मारुन टाकतिया…, झाला आहे रोग त्याचा इलाजही नाही, त्याचा उपचारसुद्धा नाही….
मुलगा : बरं… बरं…, बघू मग
आई : नको बाबा! येरं राजा घरी…, ये मी तुला आयुष्यभर करुन घालती घरी बसून…
मुलगा : बरं… बरं…
आई : तू निघ आता…, नाश्ता केला की निघ बाबा…
मुलगा : हो…
आई : आणि इथं घरी झोपून खा, मी तुला एक शब्दसुद्धा बोलत नाही…, मी करुन घालती तुला रोज…
मुलगा : बरं… बरं…
आई : निघायचं बघ लवकर…, तोंडाला रुमाल बांधून बाहेर पड…
मुलगा : अग मम्मी…, तुझं बरोबर आहे. पण, आपल्याला पोरी कोण द्यायचं लग्नाला बसून राहिल्यावर…
आई : बघू…, हे एवढे एक दोन महिने जाऊ दे…, मग जा परत हे संपलं म्हणजे…, डोस देऊन मारतात ती माणसं, असं टीव्हीला दावतियां…. तू निघायचं बघ… आपल्याला नाही राहायचं तिथं, महिन्या दोन महिन्यांनी या रोगाचा निदान झाल्यावर मग परत आणिक जा तू…. तू लगेच निघ आता, तोंडाला रुमाल बांधून यं…
मुलगा : हा…
आई : कपडे घेऊन ये आणि आला की घरात कपडे नेऊ नको…, टाकीपाशी ठेव, मी उद्या त्याला चांगलं धुवीन औषधी घालून….
मुलगा : बरं… बरं…
आई : हा…, तू आल्याशिवाय मी जेवणार पण नाही आणि पाणीसुद्धा पेणार नाही…
मुलगा : नाही नाही…, येतो मी आज
आई : ठेऊ का मग…?
मुलगा : हा… हा..From around the web