मुख्यमंत्री साहेब, अन्वय नाईक कुटुंबियां प्रमाणे न्याय द्या !

उस्मानाबादेत ढवळे कुटुंबियांची आर्त हाक 
 
मुख्यमंत्री साहेब, अन्वय नाईक कुटुंबियां प्रमाणे न्याय द्या !

उस्मानाबाद - अन्वय नाईक यांच्याप्रमाणे आर्थिक फसवणुकीमुळे आत्महत्या केलेले कसबे तडवळे येथील शेतकरी कै. दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या आरोपींना अटक करावी  व अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांना ज्या पद्धतीने न्याय दिला त्याच पद्धतीने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी मयत दिलीप ढवळे यांच्या पत्नी वंदना ढ़वळे आणि ढ़वळे  कुटुंबियाने पत्रकार परिषदेत केली आहे.

तेरणा कारखान्याने कर्जापोटी दिलीप ढवळे यांची जमीन वसंतदादा सहकारी बँकेकडे गहाण ठेवली होती. कारखान्याने कर्ज न भरल्याने बँकेने ढवळे यांची जमीन लिलावात काढली होती. या तणावामुळे ढवळे यांनी शेतात गळफास लावून आत्महत्या केली.ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी दि. १२ एप्रिल रोजी उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील शेतकरी दिलीप शंकर ढवळे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली होती. 

आत्महत्येपूर्वी त्यांनी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्यामुळे आपल्याला मानहानी सहन करावी लागली. त्यातून जमिनीवर जप्ती आली. या सर्व त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले होते. सविस्तर पुरावे घरी कपाटातील पिशवीत पाहायला मिळतील, असेही आत्महत्त्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले होते. 

ढवळे कुटुंबियांची पत्रकार परिषद 

दिलीप ढवळे यांनी सुद्धा अन्वय नाईक यांच्याप्रमाणेच २०१९ सालीच आत्महत्या केली आहे. त्यांनीही आपल्या मृत्युला जबाबदार असणाऱ्या संबधित लोकांची नावे चिठ्ठी मध्ये लिहिली होती. त्याचे नावावर तेरणा कारखान्याने वसंतदादा बँकेकडून ३ लाख कर्ज उचलले होते, जे फेडण्याची हमी तेरणा कारखान्याने लेखी आणि ओमराजेंनी तोंडी दिलेली होती. दिलीप ढवळे यांनी  केलेल्या कामाचे तेरणा कारखान्याकडे  ३.२५ लाख रुपये येणे होते.. ज्यातून त्यांनी त्याचे पूर्ण कर्ज परतफेड करणे गरजेचे होते. पण तेरणाने फक्त १ लाख ३५ हजार वसंतदादा बँकेला दिले आणि उर्वरित रक्कम तेरणा कडून भरली नाही म्हणून दिलीप ढवळे यांच्या शेतीचा लिलाव काढला. 

दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वसंतदादा बँकेने दीड लाख रुपये साठी दिलीप ढवळे यांच्या शेताचा लिलाव काढला, त्याच बँकेचे चेअरमन विजयकुमार दंडनाईक यांच्या जयलक्ष्मी कारखान्याकडे सुद्धा दिलीप ढवळे यांचे तीन लाख रुपये २०१२ पासून येणे बाकी आहेत. ते सुद्धा त्यांनी दिले नाहीत किंवा त्याच्या कर्ज खात्यात जमा केले नाहीत. हे सगळं प्रकाशासारखे स्वच्छ दिसत असताना, सरकारच्या मात्र डोक्यात उजेड का पडत नाही ? असा सवाल ढवळे कुटुंबियाने केला आहे. 

निवडणुकीच्या प्रचार सभे मध्ये विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती की, आम्ही दिलीप ढवळे यांना न्याय देवू,  त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही... मग काय न्याय दिला ?  दिलीप ढवळे यांच्या कर्जाची परतफेड केली ? आरोपींना अटक झाली ? चार्ज शीट दाखल केले ? दिलीप ढवळे यांची शेती सोडवून दिली ?  याच जमिनीच्या तुकड्यासाठी दिलीप ढवळे यांच्या कुटुंबाला आपला जीव द्यावा लागेल ?मुख्यमंत्री साहेब तुम्ही आम्हाला अंधारात नाही तर जाहीर सभेत वचन दिले होते... हे सर्व मीडियाने देशभरात दाखवले होते... मग आता तो शब्द कधी पूर्ण करणार ?कारण या महाराष्ट्रात शब्द पाळण्याला खूप महत्त्व आहे..  तीच आपली संस्कृती आहे... अन्वय नाईक यांच्याप्रमाणेच आम्हालाही न्याय देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही ढवळे  कुटुंबियाने केले आहे. 


ओमराजेसह ५२ जणांवर  गुन्हा 

कट कारस्थान करून शेतकर्‍याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकर यांना जबाबदार धरण्यात आले आहे. ओम राजेनिंबाळकर यांच्यासह ५२ जणांवर फसवणूक व शेतकर्‍यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात सप्टेंबर २०१९ मध्ये   गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

From around the web