वशिलाचे तट्टू असलेले उस्मानाबादचे सिव्हिल सर्जन बदला
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५८६३ झाली आहे. गेल्या पाच दिवसात ८७ जणांचा बळी गेला असून, दररोज किमान २० जणांचा मृत्यू होत आहे. दरररोज मृत्यूचे आकडे पाहून लोक भयभीत होत आहेत. ग्रामीण भागात लोक गाव सोडून शेताकडे राहण्यास जात आहेत.
अश्या बिकट परिस्थितीमध्ये लोकांना धीर देण्याची गरज आहे. पालकमंत्री शंकरराव गडाख २६ जानेवारीनंतर उस्मानाबादला आले नव्हते, उस्मानाबाद लाइव्हने त्याचा समाचार घेतल्यानंतर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी देखील पत्रक काढून पालकमंत्र्यावर घणाघाती टीका केली.
अखेर आज पालकमंत्री शंकरराव गडाख उस्मानाबादेत दाखल झाले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संदर्भात बैठक सुरू आहे. दर आठवड्याला अशी बैठक अपेक्षित आहे. उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयाचा ऑक्सिजन प्लांट लवकरात लवकर कसा सुरु होईल, रेमडेसिवीर इंजेक्शन कसे उपलब्ध होतील, याचे नियोजन झाले पाहिजे. नगर मध्ये बसून व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन आता भागणार नाही. प्रत्यक्ष आले पाहिजे.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे आघाडी सरकार आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. पालकमंत्री शिवसेनेचे आहेत. जिल्ह्यात एक खासदार आणि तीन आमदार शिवसेनेचे आहे. मग अडचण नेमकी कुठे आहे ?
सिव्हिल सर्जन बदला
उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील हे वशिलाचे तट्टु आहेत. केवळ एका राजकीय नेत्याचा सासरा म्हणून त्यांना या पदावर बसवण्यात आले आहे. गतवर्षी डॉ. गलांडे कुचकामी ठरले म्हणून डॉ. पाटील यांना पदभार देण्यात आला, पण डॉ. गलांडे बरे म्हणण्याची वेळ आली आहे.
उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यानी मोठमोठे हॉस्पिटल थाटले आहेत. त्यांची कमाई जोरात सुरु आहे. डॉ. पाटील यांचे देखील हॉस्पिटल आहे. त्यांचा कारभार ढिम्म सुरु आहे. जिल्हा रुग्णलयात भरती होणाऱ्या रुग्णावर वेळेवर उपचार होत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
डॉ. पाटील यांना नीट नियोजन करता येत नाही. अनेक कर्मचारी कामचुकारपणा करीत आहेत. लॅबचे इन्चार्ज असलेल्या डॉक्टर मॅडम महिन्यातून कधी तरी हजेरी लावत आहेत. सर्व भार कर्मचारी सांभाळत आहेत. कोरोनाचे टेस्टिंग रिपोर्ट वेळेवर येत नाहीत, त्यामुळे रुग्ण पॉजिटीव्ह का निगेटिव्ह हे समजायलाच तीन ते चार दिवस लागत आहेत. लॅबच्या इन्चार्ज डॉक्टरची हकालपट्टी झाली पाहिजे. जे कर्मचारी कामचुकार कर्मचारी आहेत त्यांना घरचा रस्ता दखवला पाहिजे.
ही वेळ आणीबाणीची आहे. अश्यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी अंग झाडून काम केले पाहिजे. सीमेवर आपला सैनिक जसा ड्युटी बजावतो, तोच आदर्श आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतला पाहिजे तरच कोरोना आटोक्यात येईल. अन्यथा लोकांचा हाकनाक बळी जाईल.