डीवायएसपी दिलीप टिपरसें हाजीर हो !

तुळजापूर व्यापारी संकुल घोटाळा प्रकरणी आरोपी मोकाट 
 
डीवायएसपी दिलीप टिपरसें हाजीर हो !
तुळजापूरचे समाजसेवक राजाभाऊ माने यांनी दाखल केलेल्या याचिका प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात ३ डिसेंबर रोजी सुनावणी 

तुळजापूर -  तुळजापूर नगर परिषदेच्या मालकीच्या जागेवर बनावट निविदा दाखल करून  चार मजली व्यापारी संकुल उभे करणाऱ्या  लातूरच्या सुनील फर्म इंजिनिअरींग कंपनीवर गुन्हा झाल्यानंतर सर्व आरोपी २६ महिने झाले तरी  मोकाट  आहेत. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने उपविभागीय अधिकारी तथा तपासाधिकारी  दिलीप टिपरसे यांना संबंधीत सर्व कागदपत्र घेऊन ३ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 


तुळजापूर बसस्थानकाच्या जवळ नगर परिषदेच्या मोक्याच्या जागेवर लातूरच्या सुनील फर्म इंजिनिअरींग कंपनीने बीओटी तत्वावर चार मजली व्यापारी संकुल बांधले आहे. त्यात ८४ दुकाने असून, पैकी २८ दुकाने ३० वर्षाच्या करारावर विकण्यात आले आहेत. तसेच बाकी दुकाने भाड्याने देण्यात आले आहेत. 

हे व्यापारी संकुल बांधताना  सुनील फर्म इंजिनिअरींग कंपनीने नगर परिषदेच्या अधिकाऱ्याना  हाताशी धरून  इतर दोघांच्या नावे  बनावट निविदा दाखल केली होती. याप्रकरणी समाजसेवक राजाभाऊ माने हे सन   २०११ पासून पाठपुरावा करीत होते. त्यानंतर सन २०१७ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. 

            मे. सुनील फर्म इंजिनिअरींग कंपनी लातूर यांनी तुळजापूर नगर परिषद मालकी असलेला भूखंड हडपण्याकरिता तुळजापूर न.प.च्या राजकीय लोकांना व न.प.अधिकारी यांना हाताशी धरून संगनमताने पूर्वनियोजित कट रचून बी.ओ.टी खाली सर्वे न.2 व आरक्षण क्रमांक 42 मधील शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय बनावट कागदपत्रा आधारे, मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम न करता अनाधिकृत बांधकामे केली व त्याद्वारे  ठेकेदार में.सुनील फर्म इंजिनिअरिंग कंपनी लातूर व इतर यानी संगनमत करून कट रचला व नगर परिषद तुळजापूरचे आर्थिक फसवणूक केली व ठेकेदारांनी नगरपरिषदेची मालमत्ता अनाधिकृतरित्या ताब्यात घेऊन तिचा अनाधिकृत वापर करत असल्याने चौकशी अंती निष्पन्न झाल्यानंतर दिनांक  26 - 9 - 2018 रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 304 / 2018 कलम 420 , 406 , 465 ,409, 467 , 468 , 471 ,120(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होवून   २६ महिने झाली तरी प्रकरणातील तपासाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी   दिलीप टिपरसे हे  आरोपींना पाठीशी घालत असून  सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत.

या प्रकरणी समाजसेवक राजाभाऊ माने यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.खंडपीठाने  या प्रकरणातील तपासाधिकारी दिलीप टिपरसे यांना नमूद गुन्हा संबंधित सर्व कागदपत्रासह  उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे समोर दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे  सुनील फर्म इंजिनिअरींग कंपनीच्या संचालकांचे धाबे दणाणले आहेत. 
 

From around the web