तेरखेड्यात सशस्त्र दरोडा; दहा लाखाचे दागिने लंपास 

 
तेरखेड्यात सशस्त्र दरोडा; दहा लाखाचे दागिने लंपास

वाशी - तालुक्यातील तेरखेडा येथील  व्यापारी शंकर वराळे यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम मिळून दहा लाखाचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे तेरखेडा परिसरात खळबळ उडाली आहे.


मिळालेली माहिती अशी की , तेरखेडा  येथील मुख्य बाजारपेठेत शंकर वराळे यांचे दोन दुकाने आहेत. या दोन्ही दुकानाच्या मध्यभागी असलेल्या चैनल गेटचे कुलूप तोडून दरोडेखोरांनी दुकानाच्या मागे असलेल्या घरात प्रवेश केला.रात्री दोन वाजण्याच्या सुमारास आण्णा, आण्णा दार उघडा आम्हाला साखर पाहिजे, असा आवाज दिल्याने अण्णांनी दार उघडताच अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यावर धारदार सुरा लावला आणि आवाज केला तर तुमचा जीव घेऊ अशी धमकी दिली. काही बोलण्या पूर्वी कपाटातील रोख ४ लाख ७० हजार सोने व त्यांच्या पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिने अंदाजे दहा तोळे असा ९ लाख ९५ हजाराचा ऐवज अवघ्या पाच मिनिटात चोरुन पळ काढला. एकूण चार ते पाच दरोडेखोर होते. सर्वजण मराठीतून बोलत असल्याचे वराळे यांचे म्हणणे आहे. 

घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलीस स्टेशनचे  सहाय्यक पोलिस निरीक्षक पंडित सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी श्वान पथकाकडून तपासाचे काम सुरु होते. सकाळी ७:३० वा. गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो उपनिरिक्षक नाईकवाडी करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच सकाळी आठ वाजता कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकरण काशीद व सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक राज तिलक  रौशन यांनी घटनास्थळी भेटी दिल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात ऐन  दिवाळी मध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने जनतेत घबराट पसरली आहे. 

मुरूममध्ये चोरी 

 मुरुम: मल्लप्पा रामचंद्र ब्याळीकुळे, रा. देसट्टे गल्ली, आलूर, ता. उमरगा यांच्या राहत्या घराच्या लाकडी फळ्या अज्ञात चोरट्याने दि. 11 व 12.11.2020 रोजी रात्री तोडून घरातील 20 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम 80,000 ₹ चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या मल्लप्पा ब्याळीकुळे यांनी आज दि. 12.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web