उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा ९ दिवसांचा जनता कर्फ्यू लागू
उस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कोरोनाची संख्या साखळी खंडित करण्यासाठी दिनांक १५ ते २४ मे दरम्यान ९ दिवसांचा पुन्हा जनता कर्फ्यू लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.
दिलेल्या आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की, कोरोना विषाणूंच्या संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने ब्रेक द चैन अंतर्गत पारित केलेल्या आदेशानुसार संदर्भ क्र. ९ मध्ये नमूद आदेशान्वये जिल्ह्यामध्ये १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत करावयाच्या कारवाईबाबत सविस्तर मार्गदर्शन सूचना दिलेल्या असून आठवड्यातील शनिवार व रविवार जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सलग जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व नागरिक यांच्याकडून निवेदने प्राप्त होत होती. त्यामुळे संदर्भ क्रमांक ५ अन्वये जिल्ह्यात ५ ते ११ मे २०२१ या कालावधीमध्ये जनता करपू लावण्यात आला होता रमजान ईद व अक्षय तृतीया या सणाच्या पार्श्वभूमीवर सदर आदेशामध्ये सूट देण्यात आली होती. परंतू जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेऊन जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लावणे आवश्यक असल्याच्या निष्कर्षाप्रत जिल्हाधिकारी पोहोचले असून तसेच संदर्भ क्र.६ नुसार स्थानिक परिस्थितीनुसार निर्बंध लावण्याबाबत या कार्यालयास निर्देश प्राप्त झाले आहेत.
त्यामुळे जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी संदर्भ क्र. २ नुसार व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ मधील तरतुदीनुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्ह्यातील कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून १५ ते २४ मे या दरम्यान सकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत (२४ तास) या कालावधीसाठी जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
वरील कालावधीमध्ये अत्यावश्यक बाबींच्या अनुषंगाने यासोबतच या परिशिष्ट क्र. १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे संदर्भ क्र.४ मधील नमूद आदेशान्वये ज्या अत्यावश्यक सेवा पूर्ण वेळ चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्या अत्यावश्यक सेवा पूर्ण वेळ सुरू राहतील, असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.