उस्मानाबाद - सोलापूर रेल्वेमार्गासाठी 660 हेक्टर जमीन होणार संपादित होणार
उस्मानाबाद : गेले अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सोलापूर- उस्मानाबाद 84 किलोमीटर रेल्वेमार्गासाठी 660 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी उस्मानाबाद लाइव्हशी बोलताना दिली.
सोलापूर- उस्मानाबाद रेल्वेमार्गामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जोडले जाणार आहेत. या मार्गाच्या कामास दिवसेंदिवस गती मिळत आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी लाइनमार्किंगचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम नुकतेच पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
बाधित होणाऱ्या जमिनीचे संपादन करण्यास पुढील आठवड्यात प्रत्यक्षात सुरवात केली जाणार आहे. बाधित होणाऱ्या जमिनींमध्ये शासन आणि शेतकऱ्यांच्या जमिनींचा समावेश आहे. 84 किलोमीटरच्या मार्गासाठी लागणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि शासनाच्या जमिनीच्या भूसंपादनाचा अंतिम अहवाल सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सादर करण्यात आला आहे. सोलापूर- उस्मानाबाद मार्गामध्ये एकूण 33 गावांमधून हा मार्ग जाणार आहे. यात उस्मानाबादमधील 9, तुळजापूर येथील 15 तर सोलापूरमधील 9 गावांचा समावेश आहे.
या गावांतून जाणार रेल्वेमार्ग
या मार्गात बाळे, केगाव, भोगाव, गुळवंची, कारंबा, बाणेगाव, मार्डी, सेवालालनगर, होनसळ, वडगाव, काटी, तामलवाडी, गंजेवाडी, सूरतगाव, सांगवी काटी, गोंधळवाडी, माळुंब्रा, कदमवाडी, सारोळा, रायखेल, हंगरगा, मंगरुळपाटी, तुळजापूर, तडवळा, बोरी, बावी, वडगाव, पळसवाडी, देवळाली, शेखापूर, सांजा, जहागीरदारवाडी,या गावांचा समावेश असणार आहे.
....
मागील पंधरा दिवसांपूर्वी जमिनी भूसंपादनाबाबत उस्मानाबाद जिल्हाधिकारी आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांना अहवाल देण्यात आला होता. पुढील आठवड्यात जमीन संपादनाच्या कामास सुरवात होणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत त्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल.
- ओमराजे निंबाळकर, खासदार, उस्मानाबाद
ठळक बाबी...
- सोलापूर- उस्मानाबद मार्गामुळे मराठवाडा, दक्षिण भारत, सोलापूरचा होणार फायदा
- नवीन गाड्या सुरू होण्याची शक्यता
- दक्षिण भारतात जाण्यासाठी सुकर मार्ग
- व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी यांच्या प्रवासाची होणार सोय
- सेंटर लाइनमार्किंगचे काम पूर्ण