उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायत बिनविरोध

 
उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायत बिनविरोध

उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२८  पैकी ४२ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. यात सर्वाधिक ग्रामपंचायती उमरगा तालुक्यातील आहेत. यात उमरगा ११ , भूम ७, कळंब ६ , लोहारा, परंडा प्रत्येकी ५, वाशी १ समावेश आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी पडली असताना, ग्रामीण भागात ग्रामपंचायत  निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी (दि.४) उमेदवारी काढून घेण्याच्या शेवटच्या दिवशी गावपातळीवर अनेक राजकीय घडामोडी होऊन जिल्ह्यातील ४२ गावातील गावपुढाऱ्यांना आपल्या ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यात यश आले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील पहील्या टप्प्यातील ग्रामपंचायती निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. दि. २३ डिसेंबर रोजी याकरीता उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होऊन दि.३० डिसेंबरला संपला. दि.३१ रोजी छाननी होऊन दि.४ जानेवारी रोजी उमेदवारी काढून घेण्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान, कांही ग्रामपंचायतींमधील लढत दि.३१ च्या छाननीनंतरच स्पष्ट झाली होती. परंतु, नंतरच्या चार दिवसांमध्येही मोठ्या प्रमाणात हालचाली होऊन अनेक राजकीयदृष्ट्या संवेदनशील व महत्वाच्या गावांमध्येही निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले अाहे. जिल्ह्यातील एकूण ३६५२ नूतन सदस्य निवडीसाठी ही निवडणूक होत होती. याकरीता ९ हजार ९४७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यातुन शेवटच्या दिवशीअखेर ४२ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत.

तालुकानिहाय बिनविरोध निघालेल्या ग्रामपंचायती

उमरगा : ११ ग्रामपंचायती बिनविरोध - मुळज, बलसूर, जकेकूर, जकेकूरवाडी, बाबळसूर, चिंचकोटा, भिकार सांगवी, एकोंडी(जहागीर), पळसगाव, मातोळा अाणि कोळसूर (गुंजोटी).

लोहारा : ५ ग्रामपंचायती बिनविरोध-आरणी, मार्डी, राजेगाव, तावशीगड, धानुरी.

भूम : ७ ग्रामपंचायती बिनविरोध -उमाचीवाडी, बेरदवाडी,नान्नजवाडी, सोन्नेवाडी, वरूड, बागलवाडी, गोलेगाव.

परंडा : ५ ग्रामपंचायत बिनविरोध -देवगांव, खंडेश्वरवाडी, कपिलापूरी, उंडेगाव, भोंजा.

कळंब : ६ ग्रामपंचायती बिनविरोध - भाटशिरपूरा, वाकडी, आडसूळवाडी, लासरा, दुधाळवाडी,हळदगाव.

उस्मानाबाद : ३ ग्रामपंचायत बिनविरोध - धुत्ता, डकवाडी, पोहनेर.

तुळजापूर : ४ ग्रामपंचायत बिनविरोध – बारूळ, वानेगाव, अमृतवाडी, पिंपळा खूर्द

वाशी : १ ग्रामपंचायत बिनविरोध -सारोळा.

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या असल्या तरी, दाऊतपूर ( ता. उस्मानाबाद ) सारख्या अनेक छोट्या गावात तीन ते चार पॅनल आमने - सामने उभे आहेत.  दाऊतपूरमध्ये ९ जागेसाठी ३२  उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. चार पॅनल उभे असून, काही पॅनेलला उमेदवार सुद्धा मिळाले नाहीत. 

From around the web